उसर्रा : आरोग्य विभागाकडून ० ते ५ वयोगटातील बालकांवर विविध योजना राबविते. पण संबंधित विभाग नियमित उपचार तसेच अंगणवाडी कडून पोषण आहार पुरवठा करूनही आरोग्य केंद्र जांब अंतर्गत येणाऱ्या उसर्रा व ताडगाव येथील १९ बालकावर कुपोषणाची गडद छाया पसरली आहे.मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील दोन अंगणवाडी केंद्रावर १३ कुपोषित बालके तर ताडगाव येथील ६ बालके कुपोषित निघाल्याने आरोग्य यंत्रणा कुचकामी झाले असून संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह पडले आहे. यात श्रेणी दोन मध्ये तीन तर श्रेणी तीन मध्ये १६ बालकांचा समावेश आहे. उसर्रा येथे आयुर्वेदिक रुग्णालय आहे. या रुग्णालयात केसरकर नामक आरोग्य सेविका आहेत. पण त्या कधीही नोकरीवर येत नाही. अंगणवाडीतील बालकांची तपासणी, गरोदर स्त्रियांची तपासणी तसेच अंगणवाडीतील पोषण आहाराची जबाबदारी त्यांची असते. पण कामावरच येत नसल्याने सदर आरोग्यसेविकेचे अंगणवाडीवरचे नियंत्रण तुटून गेले आहे. त्यामुळे कुपोषणाच्या संख्येत मागील दोन वर्षापासून जास्त आहे. काही नागरिकांनी सदर आरोग्यसेविकेला हटविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण प्रशासनाकडून आरोग्य सेविकेस अभय देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाच्या मानवविकास कार्यक्रम अंतर्गत ० ते २ वर्षापर्यंत बालकांची, गर्भवती स्त्रिया आणि बाळंतीण स्त्रिया यांची आरोग्य केंद्र जांब येथे बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ यांच्या मार्फत तपासणी केली जाते. तरीही या योजनेला तेवढा काही फायदा होत नसल्याने नागरिकांनी कमालीचा संताप व्यक्त केला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत राजमाता जिजाऊ अभियान हा शासनाचा उपक्रम आहे. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आदीचे काम अंगणवाडी सेविकेचे असते. तरीही १९ बालके कुपोषणाच्या गडद छायेत असून पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे. (वार्ताहर)या सर्व बाबीवर अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेविकेने याकडे लक्ष द्यायला हवे. सर्व बालकांची तपासणी आली असून त्यांना संदर्भसेवा देता येईल. आरोग्याची काळजी घेणे हे नागरिकांचे कार्य आहे.-जी.एम. आडेविस्तार अधिकारी, पं.स. मोहाडी.१३ कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली आहे. सतत २१ दिवसापर्यंत आहार देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे मोजमाप करण्यात येईल. सर्व बालकांवर औषधोपचार सुरु आहे.-डॉ.संजय बोंबार्डेवैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदीक रुग्णालय, उसर्रा.
ऊसर्रा येथे १९ बालके कुपोषित
By admin | Updated: March 26, 2015 00:36 IST