सद्गुरु वाचोनि सापडेना सोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 08:22 PM2020-08-14T20:22:50+5:302020-08-14T20:25:12+5:30

सृष्टी सुधारण्याचं काम जरी विज्ञान करीत असेल तरी दृष्टी सुधारण्याचं काम आध्यात्मच करतं म्हणून माणसाने व्याधीने ग्रासण्याच्या आधी सद्गुरुचे पाय धरायला हवेत..!

without Guru could not be found way..! | सद्गुरु वाचोनि सापडेना सोय..!

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय..!

googlenewsNext

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

सद्गुरु कृपेवाचून आत्मज्ञान मिळत नाही आणि हे आत्मज्ञान मिळाल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही, असं मी म्हणत नाही तर असा शास्त्राचाच सिद्धांत आहे. स्वामी विद्यारण्य म्हणून एक थोर विभूती होऊन गेली ते असं म्हणतात -

ज्ञानादेव तु कैवल्यं इति शास्त्रेषु डिंडिमः ।

'ज्ञानादेव तु कैवल्यं' म्हणजे काय.? तर 'ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो' अन्य कुठल्याही मार्गाने मोक्षाची प्राप्ती नाही. 'ज्ञानात् एव' म्हणजे फक्त ज्ञानानेच असा या शब्दाचा अर्थ. आत्मज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने मोक्षाची प्राप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्ण गर्भगीतेमध्ये अर्जुनाला सांगतात -

नाना शास्त्र पठेल्लोके नाना देवं च पूजयेत् ।
आत्मज्ञानविना पार्थ मुक्तीर्नास्ति कदाचन ॥

याचा अर्थ काय.? तर, हे अर्जुना.! तूं निरनिराळी शास्त्रं वाच, निरनिराळ्या देवांची पूजा कर परंतु जोपर्यंत तुला आत्मज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तुला मोक्षाची प्राप्ती होणार नाही.

आपले जगद्गुरू, जगद् वंदनीय, संतश्रेष्ठ, संतमुकुटमणी, वैराग्यमूर्ती, प्रातःस्मरणीय, देहूनिवासी तुकाराम महाराज मात्र माणसाला जन्ममृत्यूच्या भवचक्रातून सुटण्याचा मार्ग सांगतात-

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ॥

आता मुद्दा हा निर्माण होतो की, आम्ही विद्वान आहोत, व्युत्पन्न आहोत, वेदशास्त्रांत पारंगत आहोत. वेदान्त शास्त्राचा अभ्यास करुन हे आत्मज्ञान आम्ही सहज मिळवू त्यासाठी सद्गुरुच कशाला हवेत..? असा प्रश्न कित्येकांना पडेल पण शास्त्रप्रमाण असं सांगतं की, सद्गुरुकृपा झाल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. जगद्गुरु भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शांकरभाष्यात वर्णन करतात -

आत्मज्ञानाय, तत्वमस्यादि वाक्यार्थ विचाराय, सद्गुरुं समाश्रयेत् ।
अनेन, स्वयमेव व्युत्पत्ती बलेन, वाक्यार्थ विचारः क्रियमाणो न फलाय ॥

स्वतःच्या बळाने किंवा पांडित्याने माणसाला आत्मज्ञान मिळणार नाही तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे 'धरावे ते पाय आधी आधी' तर हे आत्मज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी माणसाला सद्गुरुच्या चरणांचाच आश्रय घ्यावा लागेल..!

एकदिवस सर्व संतांचा मेळा तीर्थयात्रा करीत करीत तेरढोकीला आला. कोण होतं बरं तेरढोकीला..?

तेरढोकीचा राहणार संत गोरोबा कुंभार ।
घट निर्मावयाचा व्यापार वृत्ती निरंतर पांडुरंगी ॥

तर तेरढोकीला संत गोरोबा काका राहत होते. त्यांचा तिथे मातीचे घट निर्माण करण्याचा म्हणजे कुंभाराचा व्यवसाय होता. सर्व संतमेळा गोरोबा काकांच्या घरी जमला. त्यावेळी काका थापटण्याने मडकी पारखीत होते. ते पाहून लहानगी मुक्ताई सहजच गोरोबा काकांना म्हणाली, 'काका.! या थापटण्याने या मडक्यांवर तुम्ही असं का मारताय हो.?' तेव्हा गोरोबा काका तिला म्हणाले, 'अगं मुक्ते.! या थापटण्यामुळे तर मला कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्क आहे हे कळतं.!' मुक्ता म्हणाली, 'काका.! मग इथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर हे थापटणं मारुन पहा ना.! कोणतं मडकं कच्च आहे आणि कोणतं मडकं पक्क आहे ते तरी कळेल.!' मुक्ताईचा तो लडिवाळ हट्ट पुरविण्यासाठी काकांनी तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारायला सुरुवात केली. मुक्ताई झाली, ज्ञानोबा झाले, सोपान झाला. एका बाजूला उभं राहून नामदेव हा सारा प्रकार पहात होते त्यांच्यापर्यंत गोरोबा काका आले. आता ते नामदेव महाराजांच्या डोक्यावर थापटणं मारणार एवढ्यात नामदेव महाराज रागाने म्हणाले, 'काका.! पुरे करा ही कुचेष्टा.! मी त्या विठ्ठलाचा सर्वांत जास्त लाडका आहे, कच्चा आणि पक्का ठरवून घेण्याची मला गरज नाही.!' नामदेवांचा तो अनावर राग बघितला आणि मुक्ताईसहित सगळीच संतमंडळी नामदेवांना 'नामा कच्चा, नामा कच्चा' म्हणून चिडवू लागली. यावर नामदेव महाराज गप्प बसले नाहीत -

नामा कच्चा म्हणता धावूनि ये तो त्वरे भिमानिकटी ।
कळवि तिष्ठे त्या जो ठेवुनि कर आश्रित भिमानिकटी ॥

नामदेव महाराज थेट पांडुरंगाकडे आले, सर्व वृत्तांत सांगितला आणि धाय मोकलून रडू लागले. पांडुरंग नामदेवाला म्हणाले, ' अरे नाम्या.! तू माझा लाडका असलास तरी षड्विकार जिंकलेल्या सद्गुरुला शरण गेल्याशिवाय

वासुदेवः सर्वमिती ।
अशी समदृष्टी प्राप्त होत नाही आणि अशी समदृष्टी प्राप्त न झाल्यामुळेच तर 'तू कच्चा' असं सर्वजण म्हणाले. नाम्या तूं विसोबा खेचरांकडे जा आणि अनुग्रह घे. पांडुरंगाच्या उपदेशानं नामदेव महाराज विसोबांकडे आले. विसोबा औंढा नागनाथ येथील शंकराच्या मंदिरात पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवांनी ते ध्यान बघितलं आणि मनांत म्हणताहेत, हे कसले सद्गुरु..? नामदेव विसोबांना म्हणाले, अहो महाराज.! तुम्ही तर चक्क महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहात तेवढे पाय जरा खाली घ्या. तेव्हा विसोबा त्यांना म्हणाले, बाबारे.! माझ्यात काही पाय उचलण्याचं त्राण नाही. असं कर, तूच माझे पाय उचल आणि बाजूला कर.! नामदेवांनी विसोबांचे पाय उचलून बाजूला केले पण चमत्कार असा की पायाखाली परत एक पिंड तयार. नामदेवांनी परत पाय उचलून बाजूला केले पण पुन्हा तेच. असं एक दोनदा नाही तर अनेकदा झालं आणि मग मात्र नामदेवांची दृष्टी बदलली. 'सृष्टी सुधारण्याचं काम जरी विज्ञान करीत असेल तरी दृष्टी सुधारण्याचं काम आध्यात्मच करतं..!' तो पटकन विसोबांच्या चरणकमलांवर नतमस्तक झाला. त्यांनी त्याच्या डोक्यावर कृपाहस्त ठेवला.
ज्ञानराज माऊली म्हणतात -

गुरु तेथे ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन ।
आत्मदर्शनी समाधान । आथी जैसे ॥

आता नामदेवाला आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला. सर्वांतरयामि भगवंत दिसू लागला. अशी ही सद्गुरुकृपेची किमया म्हणून व्याधीने ग्रासण्याच्या आधी सद्गुरुचे पाय धरा..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

Web Title: without Guru could not be found way..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.