Vijayadashami Dasara 2025: दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा || हिंदूचा एक प्रमुख सण व शुभ दिवस. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापना असून, या दिवसापासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच ‘विजय’ नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणांत सांगितले आहे. यंदा २०२५ मध्ये दसरा कधी आहे? महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी उत्सवाचे वैशिष्ट्य, महत्त्व, मान्यता जाणून घेऊया...
गुरुवार, ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन शुद्ध दशमी दसरा आहे. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात. रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान ठेवले. अर्जुनाने अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले व आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली. हा विजयोत्सव असल्याने राजांनी आपल्या घोड्यांना सुशोभित अलंकार घालावे, निराजन नावाचा विधी करावा, शस्त्रास्त्रांचे पूजन करावे व विजयासाठी प्रस्थान करावे असे सांगितले आहे. हा दिवस शुभ असल्यामुळे हिशेबाच्या वह्या, जुन्या पोथ्या, यंत्रे, शस्त्रे इ. वस्तूंचे पूजनही या दिवशी करतात. पावसाळा संपून नवीन धान्य घरात आलेले असते. म्हणून शेतकरी वर्ग हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो.
महाराष्ट्रातील दसरा सणाचे वैशिष्ट्य
भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. तेथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो. महाराष्ट्रात या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात. तसेच शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात. घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
- उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवसांच्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.
- गुजरातमध्ये सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची पूजा केली जाते. छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते. चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे
- आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हणले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.