तारक मंत्र पाठ नाही असा एकही स्वामी भक्त आढळणार नाही. मन कितीही उद्विग्न असू दे, पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र (Swami Samartha Tarak Mantra) नुसता म्हंटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. मात्र, हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का? तर नाही! हा मंत्र रोज म्हणायला हवा तोही १०८ वेळेला! संपूर्ण तारक मंत्र १०८ वेळेला म्हणणे शक्य नाही, म्हणून त्यातील दोनच ओळी १०८ वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल.
तारक मंत्रातल्या जप करण्यासाठी उपयुक्त दोन ओळी :
नि:शंक हो, निर्भय हो मना रे,प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!
या दोन ओळीच का? तर या ओळींच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे. अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते...प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे! स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही.
मंत्र विधी :
उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी, एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते. म्हणून ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते. म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रात:काळची असावी असे सुचवले आहे. त्यावेळी मनात शून्य विचार असतात. आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरु असते. हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते. अशा वेळी उठून आसन घालून, स्वामींची प्रतिमा समोर ठेवून, उदबत्ती लावून नामजप सुरु केलात तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल. मन शांत, आरोग्य स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊ लागेल.
मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईलच असे नाही. उपासनेत बंधनं नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केलात तरी त्याचा लाभ होईल.
जप १०८ वेळा का करायचा?
संत नामदेव म्हणाले तसं, 'कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुख' म्हणजेच भजन, कीर्तन, नामःस्मरण करताना पुढच्या पाच मिनिटांत आपल्याला ग्लानी येऊ लागते, याउलट टीव्ही पाहताना, चित्रपट पाहताना, गाणी ऐकताना झोप येत नाही. त्यात आपण रंगून जातो. मात्र त्या सुखाचा काही काळाने कंटाळा येऊ शकतो, परंतु नामःस्मरणाचा कंटाळा कधीही येणार नाही. मात्र ती गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करवून घ्यावा लागेल. एक-दोनदा नाम घेऊन ती सवय लागणार नाही. त्यासाठी १०८ वेळा जप करा म्हटले आहे. एवढ्या वेळा नामःस्मरण करू तेव्हा कुठे एकदा मन नामाशी एकरूप होईल. बाकीचे १०७ विरून जातील पण ते १ नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल.
घरातील आजारपण, आर्थिक समस्येवर उपाय :
स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणारा आहे. जर घरात कोणाचे आजारपण असेल, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामःस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नांतून वाट मिळेल. एवढे नामजपात सामर्थ्य आहे, त्याचा अनुभव मनोभावे नक्की घेऊन बघा.