यंदा २७ मे रोजी वैशाख अमावस्या(Vaishakh Amavasya 2025) आहे, जी आपण शनि जयंती(Shani Jayanti 2025) म्हणून साजरी करतो. मात्र तिचा प्रारंभ २६ मे रोजी होणार असल्याने ती दर्श अमावास्या सोमवती अमावस्या(Somavati Amavasya 2025) म्हटली जाईल. आपल्याकडे अमावास्येचे आणि त्यातही सोमवती आमवस्येचे अधिक महत्त्व आहे. त्यामुळे या तिथीला पितरांशी संबंधित दिलेल्या गोष्टी आणि संगीतलेले बदल आवर्जून करा.
अनेक घरांमध्ये सश्रद्ध लोक आपल्या पूर्वजांचा फोटो लावतात. त्यांच्यावरील श्रद्धा, प्रेम आणि सद्भावना तो फोटो लावण्यांतून व्यक्त होतात. घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबीयांवर कायम राहतो अशीही श्रद्धा असते. मात्र वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावण्याची दिशा ठरलेली असते. ती जागा वगळून अन्यत्र फोटो लावल्यास वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. यासाठी पुढे दिलेल्या नियमांचे अवश्य पालन करा.
पितरांचे स्मरण ठेवणे, त्यांचा फोटो डोळ्यासमोर ठेवून रोज त्यांना नमस्कार करणे, हा निश्चितच चांगला संस्कार आहे. मात्र ती जागा कोणती असावी, दिशा कोणती असावी जेणेकरून पितरांच्या स्मृतीचे पावित्र्य जपले जाईल ते जाणून घेऊ.
घरामध्ये पूर्वजांचे फोटो लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
१. वास्तू तज्ञांचे मत आहे की पितरांचे फोटो भिंतीवरील खिळ्याला लटकवून ठेवू नका तर एखाद्या टेबलावर भिंतीचा आधार घेऊन टेकवून ठेवा.
२. बेडरूम आणि किचनमध्ये पूर्वजांचे फोटो लावू नका. घरातील या खाजगी जागा आहेत. तिथे फोटो लावल्याने घरगुती समस्या वाढू शकतात. तसेच पैशाचे नुकसान होण्याचा धोकाही वाढतो.
३. तसेच देवघराजवळ पितरांचा फोटो लावू नये. पितरांना आपण देवरूप मानत असलो तरीदेखील त्यांचा फोटो देवघराजवळ लावणे योग्य नाही. तो देवघरापासून दूर अंतरावर ठेवावा.
४. गेलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून त्यांच्याबरोबर काढलेले फोटो भिंतीवर लावू नका. स्मृती म्हणून त्यांचा स्वतंत्र फोटो लावा. त्यांच्याबरोबर काढलेले फोटो आपल्या अलबम मध्ये असू द्या, पण भिंतीवर नको! त्यामुळे आठवणींचे उमाळे येऊन नैराश्य, नकारात्मक भावना निर्माण होते.
मग फोटो नेमका कुठे लावावा?
५. घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावणे अशुभ ठरते. म्हणून घराच्या उत्तर दिशेला पितरांचा फोटो लावावा. तसे केल्यास जीवनातील त्रास कमी होतो आणि अकाली मृत्यूची भीतीही दूर होते. घराच्या उत्तर दिशेला पितरांचे चित्र लावल्याने त्यांची नजर दक्षिण दिशेला राहते असे मानले जाते.पितरांना इहलोकात इच्छा आकांक्षा न राहता दक्षिण दिशेने अर्थात यम लोकी त्यांचा प्रवास सुरू होतो.