Shravan Guruwar 2025 Swami Samarth Seva: मराठी वर्षाच्या चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण मास सुरू आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महात्म्य वेगळे आणि विशेष असेच आहे. श्रावणातील व्रते, सण धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्राचीनता, परंपरा यांची जोपासना करणारे आहेतच, याशिवाय नैसर्गिक, शास्त्रीय दृष्टिकोनातूनही याचे महत्त्व अधोरेखित होते. श्रावण गुरुवारी बृहस्पती पूजन केले जाते. गुरुवारी कोट्यवधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात. श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामी सेवा, पूजन, नामस्मरण उपासना विशेष मानली जाते.
प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. श्रावणातील पहिला गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी आहे. तर दुसरा श्रावण गुरुवार ०७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. तिसरा श्रावण गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी असून, चौथा श्रावण गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. विशेष म्हणजे चौथ्या श्रावणी गुरुवारी शिवरात्रि, गुरुपुष्यामृतयोग जुळून येत आहे. हे ४ श्रावण गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी. अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल, असे म्हटले जाते.
श्रावणातील ४ गुरुवारी ‘अशी’ करा स्वामींची सेवा
गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. गुरुवार, ३१ जुलै २०२५ ते गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीतील ४ गुरुवार येतात. या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकासारखी स्वामी सेवा करावी. अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते.
- एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करणे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा.
- दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी.
- तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वांत प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर १ जपमाळ म्हणजे १०८ वेळा तारक मंत्रांचा जप करावा.
- चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही, तर तिन्हीसांजेला दिवेलागणीला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी.
- या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा. संकल्प पूर्ती झाली की, स्वामींचे मनापासून आभार मानावेत. या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमायाचना करावी.
- श्रावण गुरुवारी शक्य असेल तर स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पारायण करावे. यातील नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करावा. ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी.
- अगदीच काही नाही, ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रांचा १०८ वेळा (१ जपमाळ) किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा.
- मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये.
- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा.
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥