श्रावण(Shravan 2025) मासात येणाऱ्या व्रत वैकल्यांचे पालन आपल्या आई आजीने केले, आताची पिढी देखील सगळी व्यवधाने सांभाळून आपली संस्कृती जपण्याचा, जाणून घेण्याचा, वाढवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे. पुढची पिढी अर्थात Gen Z यांनाही त्याबद्दल उत्सुकता आहे, मात्र त्यांच्यासमोर योग्य गोष्टी योग्य प्रकारे येणे गरजेचे आहे.
कालच एका मैत्रिणीने फोन करून विचारलं, 'माझ्या लेकीला दिव्यांच्या अवसेची कथा आवडली, पण साठा उत्तराची कहाणी कोणती आणि ती सुफळ संपूर्ण म्हणजे काय हे नाही कळलं! तर तिला उत्तर काय देऊ तूच सांग!'
मुळात आईने मुलीला दिव्यांच्या अवसेची कहाणी सांगितली, मुलीने ती ऐकून घेतली आणि त्यातून तिला प्रश्नही पडला याचंच मला अप्रूप वाटलं. तिच्या वयाला साजेसं उत्तर द्यायचं झालं तर गोष्टीची समरी किंवा सारांश असा त्याचा अर्थ सांग म्हटलं! त्यावर तिने विचारलं, 'तिच्या शंकेचं समाधान होईल पण माझ्या शंकेचं काय? मलाही याचं उत्तर हवं आहे.' त्यावर तिला दिलेलं उत्तर तुम्हीदेखील जाणून घ्या.
'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' याचा अर्थ :
'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा कथेचा शेवट चांगला आणि यशस्वी झाला आहे, असा होतो. विशेषतः व्रतकथा किंवा धार्मिक कथांच्या शेवटी हे वाक्य वापरले जाते. याचा अर्थ असा की, जी गोष्ट सांगितली जात आहे, ती पूर्ण झाली आहे आणि शेवट गोड झाला.
शब्दश: अर्थ :
साठा उत्तराची: याचा अर्थ असा होतो की, 'साठा' म्हणजे '६०' आणि 'उत्तराची' म्हणजे 'उत्तरे' किंवा 'भाग'. म्हणजे, ६० भागांमध्ये किंवा टप्प्यांमध्ये ती गोष्ट सांगितली जाते, ती 'पाचा' म्हणजे '५', उत्तरे म्हणजे उत्तर
सुफळ संपूर्ण: 'सुफळ' म्हणजे 'चांगली' आणि 'संपूर्ण' म्हणजे 'पूर्ण' किंवा 'यशस्वी'. याचा अर्थ असा की, ती गोष्ट चांगली झाली आहे आणि ती पूर्ण झाली आहे.
म्हणजेच जी गोष्ट सांगायला बराच संदर्भ द्यावा लागणार होता ती थोडक्यात सांगून झाली आणि तिचा मतितार्थ किंवा आशय लक्षात आल्याने ती सांगण्याचा हेतू सफल झाला.
पौराणिक कथा या समाज प्रबोधनार्थी वाचल्या तर त्यामागचा आशय लक्षात येईल, गोष्टीतून घातलेले संस्कार कळतील, मनाला चांगले वळण मिळेल आणि अध्यात्मिक उन्नती होईल.
हळू हळू ही ओळ वाकप्रचारासारखी वापरली जाऊ लागली. जसे की, एवढं समजवलं त्यामुळे तो सन्मार्गी लागला आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.