Shankar Maharaj Prakat Din 2025: “मैं कैलास का रहनेवाला हूं।”, असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहत असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. या शंकर महाराजांचा कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमीला प्रकट दिन साजरा केला जातो.
यंदा, गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच 'शंकर' नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत. सद्गुरु श्री शंकर महाराज अष्टावक्र होते. ते सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत असत. तसेच मालक म्हणूनही संबोधित करत असत. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे हे परमप्रिय शिष्योत्तम खरोखरीच श्रीस्वामी समर्थ महाराजांसारखेच अद्भुत आणि अतर्क्य लीलाविहारी होते.
सद्गुरु शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण स्तिमितच होऊन जातो. शंकर महाराजांच्या संदर्भातील अनेक स्तोत्रे, मंत्र नित्यनेमाने पठण करणे हजारो भाविक आहेत. शंकर महाराजांच्या कृपेची प्रचितीही शेकडो जणांना येत असते. यातील एक अकरा कवनांचे स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जाते. या स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती दिलेली आहे. या स्तोत्राचे दिवसा, रात्री पठण करणाऱ्या भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. विजय प्राप्त होईल, असे आशिर्वचन शंकर महाराजांनी दिले आहे.
श्री शंकर महाराज स्तवन
संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकर महाराज वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज।।१।।
अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी।।२।।
इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही सर्व देवता आमच्या अगदी आहेत हो तुम्ही।। ३।।
सकलहि देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनिया येत।।४।।
अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण? हे ओळखणे ही मानवा न शक्य।।५।।
जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता।।६।।
भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत।।७।।
तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन भाग्यविण या गोष्टी साऱ्या, येती ना घडुन।।८।।
तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा।।९।।
धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण।।१०।।
नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा।।११।।
अकरा कवनांचे हे स्तोत्र पठण करता दिनरात विजयी होईल सर्वत्र कामना पूर्ण होतील।।१२।।
।। संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय ।।
।। जय शंकर ।।
Web Summary : Shri Shankar Maharaj's Prakat Din is on October 30, 2025. He appeared in Antapur, Nashik. Reciting the eleven-verse stotra fulfills wishes and brings victory, as blessed by Shankar Maharaj. This stotra, when recited day or night, ensures success and wish fulfillment for devotees.
Web Summary : श्री शंकर महाराज का प्रकट दिन 30 अक्टूबर, 2025 को है। वे नासिक के अंतापुर में प्रकट हुए। ग्यारह छंदों का स्तोत्र पढ़ने से शंकर महाराज के आशीर्वाद से इच्छाएं पूरी होती हैं और विजय मिलती है। यह स्तोत्र, दिन या रात में पढ़ने से, भक्तों के लिए सफलता और इच्छा पूर्ति सुनिश्चित करता है।