Shani Upasana On Shivratri And Swami Punyatithi 2025: चैत्र महिन्याची सांगता होताना शुभ व्रतांचा अद्भूत योग जुळून आला आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात मासिक शिवरात्रिचे व्रत आचरले जाते. चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्रि शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी आहे. याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तसेच या दिवशी शनिवार असल्याने शनि उपासना करणे, हनमंतांचे पूजन करणे, शनि देव आणि हनुमानाचे नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते.
२९ मार्च २०२५ रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसातीचे चक्र बदलले. मकर राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. तसेच मीन राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू आहे. तर, मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. तसेच शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव समाप्त झाला आहे. तर, सिंह आणि धनु राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे. साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्या राशींनी शनिची कालातीत कृपा लाभण्यासाठी शनिवारी आलेल्या शिवरात्रि आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी काही उपाय करणे सर्वोत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
शनिवारी शिवरात्रिला करा महादेवांचे विशेष पूजन
शिवरात्रि व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवांच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक, रुद्राभिषेक करावा. मंदिरात जाणे शक्य नसेल, तर घरी महादेव शिवशंकाराचे पूजन करावे. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. तसेच यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते.
शनिवारी स्वामी समर्थ पुण्यतिथीला विशेष उपासना करा
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी शिवरात्रि असून, या दिवशी स्वामी सेवा करणे शुभ मानले जात आहे. या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पद्धतीने पारायण करावे. 'श्री स्वामी समर्थ' हा जप १०८ प्रमाणे ११ जप माळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा. स्वामींचा तारक मंत्र म्हणावा.
‘हे’ करावेच, साडेसातीत दिलासा मिळेल
- शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.
- नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा. यापैकी एका मंत्राचा दररोज १०८ वेळा जप केल्यास उत्तमच. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर शनीचे रत्न नीलम शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ हर हर महादेव ॥