Shani Jayanti May 2025: यंदा २०२५ मध्ये सोमवार, २६ मे रोजी शनैश्चर जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रतही केले जाणार आहे. वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती असते. शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो. माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो. तो कधी कुणावर अन्याय करत नाही, असे सांगितले जाते. आताच्या घडीला ज्या राशींची साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशा लोकांनी शनि जयंतीला विशेष उपासना करणे अतिशय पुण्याचे, लाभदायी आणि फलदायी मानले जाते.
२९ मार्च २०२५ रोजी शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसाती चक्र बदलले आहे. शनि हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. शनि न्यायाधीश आहे. शनि साडेसाती आणि शनि महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनैश्चर जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये. ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनि सेवा करावी. या दिवशी शनि उपासना, नामस्मरण, आराधना, जपजाप करावेत. यामुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. शनि जयंती दिनी महादेव शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन, नामस्मरण शनि प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते, असे सांगितले जाते.
कोणत्या राशींची साडेसाती आणि शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे?
शनिने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. तसेच मीन राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू आहे. तर, मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. तसेच शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव समाप्त झाला आहे. तर, सिंह आणि धनु राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे.
शनि जयंतीला आवर्जून कराव्यात ‘या’ गोष्टी
- शनैश्चर जयंतीला आवर्जून शनि मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. या वेळेस शनी महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत.
- शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनि जयंतीला शनि संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे.
- शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.
- नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा. यापैकी एका मंत्राचा दररोज १०८ वेळा जप केल्यास उत्तमच.
- कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर विशेष व्रत करावे. शनिशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर शनीचे रत्न नीलम शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे.
- शनि मंदिरात जाऊन दिवा लावावा. शनि उपासना, शनि स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनि चालिसा पठण, शनिदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.