>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
पाऊस येणार असेल त्याच्या आधी वारे वाहू लागतात, मोठी झाडे जोरात हलायला लागतात, काळेकुट्ट ढग आणि दाटून आलेला अंधार पावसाची चाहूल देतात. अगदी त्याचप्रमाणे साडेसातीच्या आधी २-३ महिने त्याचे पडसाद आपल्या आयुष्यावर उमटायला लागतात.
साडेसातीची भीती कोणाला? तर...
साडेसातीबद्दल इतकी भीती मनात असल्याचे कारण निदान मला तरी आजवर समजले नाही . ज्याने खूप चुका, पाप, दुष्कृत्ये केलेली आहेत अशा व्यक्ती साडेसाती म्हटल्यावर घाबरतात, कारण त्यांनी केलेल्या चुका त्यांना माहित असतात आणि त्याचे परिणाम आता भोगायला मिळणार हे त्यांना पक्के माहित असते म्हणून त्या मनातून घाबरलेल्या असतात. आपण जगाला कितीही रंग दाखवले तरी आपला खरा रंग ज्याने जन्माला घातले आहे त्याला बरोबर माहित असतो आणि त्याला हे माहित आहे ते आपल्यालाही माहित आहे. म्हणूनच साडेसाती आली की कापरे भरते.
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
प्रत्येकाच्या साडेसातीचा काळ वेगळा...
शनीचे भ्रमण चंद्रापासून १२-१२ ह्या भावातून असते, तो काळ साडेसातीचा म्हटला जातो. साडेसातीमध्ये प्रामुख्याने चंद्र शनीचे अंश पहावे लागतात. शनी मेष राशीत आला की वृषभ राशीला साडेसाती, असे नसते. मूळ पत्रिकेत वृषभ राशीत चंद्र १५ अंशावर असेल तर गोचर शनी मेष राशीत १५ अंशावर आला की वृषभ राशीची साडेसाती चालू होते आणि कर्क राशीत शनी १५ अंशाच्या पुढे गेल्यावर वृषभ राशीची साडेसाती संपते. हे न पाहता उगीच शनी मेषेत आला की साडेसाती चालू अशी बोंबाबोंब सुरु होते. शनीचे भ्रमण अंशतः पाहावे लागते.
जगात लाखो लोक वृषभ राशीचे आहेत, पण सगळ्यांची साडेसाती मेष राशीत शनी गेल्यावर सुरु होत नाही, समजतंय का? ज्याच्या त्याच्या वैयक्तिक पत्रिकेत चंद्र किती अंशावर आहे त्यावर साडेसातीचा प्रारंभ असतो. ज्या अंशात चंद्र असेल तितक्या अंशावर शनी आधीच्या राशीत आला की साडेसातीचे पडघम घुमायला लागतात.
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
कसे असते साडेसातीचे फळ?
शनी ज्या भावातून जात असेल त्या भावात हर्षल, मंगल, रवी असेल तर त्यावरील शनीचे भ्रमण त्रासदायक, शारीरिक मानसिक पिडा निर्माण करणारे असते. शुभ ग्रहांच्या वरून होणारे शनीचे भ्रमण आणि तेही शुभ राशीतून होत असेल तर तितकेसे त्रासदायक नसते. अग्निराशीतून त्रासदायक जल राशीतून भावनिक अशुभता वाढवणारे, वायू राशीत अनेकदा प्रगती पथावर नेणारे तसेच पृथ्वी तत्वाच्या राशीतूनही चांगली फळे मिळतात.
साडेसाती हाही एक अभ्यास आहे. पत्रीकेतीन नेमके कुठल्या भावातून, शुभ अशुभ राशीतून , कुठल्या ग्रहांच्यावरून आणि मूळ कुंडलीतील शनी कुठे स्थित आहे ह्या सर्वच विचार करून साडेसातीचे परिणाम बघावे लागतात. मूळ पत्रिकेतील शनी च्या समोर शनी आल्यास किंवा त्याच्यावर गोचर शनीची दृष्टी असल्यास ती अडीच वर्ष क्लेशकारक असतात.
साडेसातीपेक्षा पनौती वाईट :
साडेसातीपेक्षा पनौती वाईट, कारण साडेसात वर्षाचे त्रास अडीच वर्षात होतात. स्त्रियांच्या पत्रिकेत ६, ८, १२ मधील शनीचे भ्रमण वैवाहिक सुखात कमतरता आणते. जोडीदाराच्या तब्येतीला त्रास होतो किंवा स्वतःचीही प्रकृती बिघडते. सप्तम भावात हर्षल, शनी, रवी, मंगळ, राहू असतील, तर त्यावरून होणारे शनीचे भ्रमण वैवाहिक सुखाची हानी करते. दोघांमध्ये वितुष्ट येऊन वेगळे राहण्यापर्यंत वेळ येते. रवी हा पतीकारक आणि आरोग्याचाही कारक आहे. त्यावरून होणारे शनीचे भ्रमण म्हणजे आरोग्य आणि मानसिकता बिघडणे. रवी हा मानमरातब देणारा! त्यामुळे या अडीच वर्षाच्या काळात सामाजिक प्रतिष्ठा, स्वमिभान, आत्मविश्वास, निर्णयक्षमता कमी होते.
उपाय काय? तर... शनी आणि राहूच्या दशेत समाजात कमी वावरावे म्हणजे संकटे कमी येतील. आपण एखादा शब्द बोलू आणि त्याचा कोण काय भलताच अर्थ घेऊन आपल्याला पुढे नाकीनऊ येतात. गुप्तशत्रू , कोर्ट कचेऱ्या, नोकरी जाणे, अर्थार्जन व्यवसाय बंद पडणे, पोलिसांचा ससेमिरा, दिवाणी खटले ह्यांना तोंड द्यावे लागते. कर्जबाजरी झाल्यामुळे माणूस हवालदिल होतो. शनी भू गर्भाखाली असल्यामुळे शनीचे आजार म्हणजे कमरेखालील भाग विकलांग होणे, पाय, गुढगे ह्यांना त्रास, सर्जरी, वाताचे विकार, दात, हाडे दुखणे, एखादा शरीराचा अवयव सडणे, कुजणे आणि दीर्घकालीन अवस्थेत तसाच राहणे, शनीची साडेसाती असेल आणि शनी दशा असेल तर मग अधिकच सावध राहावे. शनी मनाला अपंग करतो जेव्हा शरीर अपंग होते. आयुष्यभर केलेला सगळा माज शनी क्षणात आपल्याला जागेला लावून उतरवतो. इतके असूनही मिजास कमी न होणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल न बोलणे उचित! भल्याभल्यांना शनी महाराज साडेसातीत पाणी पाजतात, त्यांची योग्य जागा दाखवून देतात आणि आयुष्य कसे जगले पाहिजे ह्याची उत्तम कार्यशाळा घेतात. साडेसातीकडे डोळस पणे पहिले तर ती आपल्या भल्यासाठीच असते.
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
साडेसातीमागे शनीदेवाचा हेतू :
ह्या जगाचा निरोप घेताना काहीतरी चांगले करून आपले नाव ठेवून जा, हाच शनीचा संदेश आहे. हा माझा तो माझा, माझी श्रीमंती, वैभव असे अनेक भ्रम आपले साडेसातीत निष्प्राण होतात. श्वास थांबला की सगळे थांबते तेही क्षणात! आयुष्यभर जमवलेले सर्व इथेच राहते आणि आपण फक्त पुढील प्रवासाला जातो. त्यामुळे घेण्यापेक्षा देण्याची सवय लावा मग वस्तू असोत अथवा ज्ञान देण्यासाठीच आपण आहोत हाच शनीचा संदेश असावा असे मला वाटते. साडेसातीत किंवा इतरवेळी उपाय म्हणजे आधी स्वतःला दीड शहाणे समजणे आणि जगातील सगळी अक्कल आपल्यालाच आहे अशा थाटात वावरणे बंद करावे तेही लगेच. ना आपल्याला पाऊस थांबवता येत, ना रक्त तयार करता येत. आपल्या हातात काहीही नाही आणि कधी नव्हतेच, त्यामुळे मी असा मी तसा. लाखो रुपयाची गाडी घ्याल, पण उद्या पेट्रोल बंद झाले तर काय ती पाण्यावर का चालणार आहे? त्यामुळे माज नको! साडेसातीत शनी आपला आवाज बंद करायच्या आधी आपण स्वतःच शहाणे होणे उत्तम. कमी आणि मार्मिक आवश्यक बोलावे, अधिकाधिक वेळ नाम घ्यावे, कुणी कसेही वागो आपल्या कर्तव्यात चुकू नये, कुणाचा द्वेष , मत्सर आणि आपला अहंकार समोरच्याला नाही तर आपल्याला विकलांग करतो, मनाने आणि शरीरानेही! क्रोनिक आजार होणे हे साडेसातीचे प्रमुख लक्षण. भल्याभल्यांना जागेवर खिळवून ठेवणारा शनी आहे. साडेसातीत आपण केलेली अनेक पापे, चुका आजारांच्या स्वरूपात आपल्या समोर हात जोडून उभ्या राहतात.
जगाला कितीही फसवू शकतो, पण आपण स्वतःला फसवू शकत नाही. म्हणून मन भयभीत होते..हेच खरे साडेसातीचे पडसाद असतात! शनीला विकत घेता येत नाही पण आपल्या अहंकाराला तिलांजली दिली आणि राजमार्गाने जीवन व्यतीत केले तर आपण शनी महाराजांच्या कृपेस पात्र ठरू हे नक्की. आपण कसेही वागू आणि कुणीच आपल्याला काहीच करू शकणार नाही हा भ्रम माणसाला कधीही नसावा. आपल्या कर्माचा लेखाजोखा मांडून त्याची फळे देण्यासाठीच नवग्रहांत शनी महाराज विराजमान आहेत ह्याचे भान असलेच पाहिजे.
रामरक्षा , हनुमान चालीसा , मंगळवारी मारुतीच्या पायावर चिमुटभर शेंदूर अर्पण करून क्षमा मागणे ह्यासारखे उपाय साडेसाती आणि एकंदरीत जीवनात आपले मनोबल वाढवतात म्हणून करत राहावे आणि सत्कर्म करावे.
संपर्क : 8104639230