दही-साखर खाऊन घराबाहेर पडण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. आजही बरेच लोक त्याचे पालन करतात. अगदी रोज नाही, पण कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आई, आजी आपल्या हातावर चमचाभर दही साखर टेकवतातच; का? ते पाहू!
शतकानुशतके पाळले जाणारे अनेक नियम आणि प्रथा आजही सश्रद्ध भावनेने पाळल्या जातात. घरातील वडीलधाऱ्यांमुळे या परंपरा आजही टिकून आहेत. फरक एवढाच की पूर्वीचे लोक या परंपरा जतन करताना त्यामागील पार्श्वभूमीदेखील समजून घेत असत, आताची पिढी एकतर त्या प्रथांचा अनादर करते किंवा डोळे बंद करून पालन करते. संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी तशा घातकच! म्हणूनच या लेखात आपण दही साखर खाण्याच्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत.
घराबाहेर पडताना दही साखर देण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक कारण म्हणजे, ज्या कामासाठी जात आहे त्या कामाची पूर्तता व्हावी हा आशीर्वाद आणि सदिच्छा त्यामागे असतात. तर दही साखर देण्यामागे वैज्ञानिक कारण कोणते ते जाणून घेऊ.
दही हे पाच अमृत तत्वांपैकी एक आहे -
हिंदू धर्मात, दही हे पाच अमृत तत्वांपैकी एक मानले गेले आहे, ज्यामुळे त्याचे धार्मिक दृष्ट्या महत्त्व वाढते. दह्याचा उपयोग पूजा, धार्मिक विधी इत्यादींमध्ये केला जातो. दह्यापासून पंचामृत बनवले जाते, महादेवालाही दह्याने अभिषेक केला जातो....
दह्याचा रंग पांढरा असल्यामुळे त्याचा संबंध चंद्राशी आहे आणि साखरेसोबत दही खाल्ल्याने चंद्र ग्रहापासून शुभ परिणाम मिळतात. चंद्राच्या शुभतेमुळे भाग्य बलवान होते आणि मनही शांत राहते. म्हणूनच शुभ कार्याला जाताना दही साखर दिले जात असे.
वैज्ञानिक कारण जाणून घेऊ -
दही हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. कारण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी6 आणि बी12 इत्यादी पोषक घटक असतात. त्यामुळे दह्याचा आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समावेश केला जातो.
अशा स्थितीत घराबाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखरेचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, कारण दह्यात साखर मिसळली की ती ग्लुकोजचे काम करते. त्यामुळे शरीरात ऊर्जा राहते आणि अपचनाचा त्रास होत नाही.
थोडक्यात काय, तर आजीचा सल्ला, प्रथा, परंपरा, विश्वास याचा ज्योतिष शास्त्र आणि आरोग्याशीही संबंध आहे. म्हणून तुम्ही देखील पुढच्या वेळी महत्त्वाच्या कामाला निघताना दही साखर खाऊनच निघा!