९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन(Raksha Bandhan 2025) आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, राखी बांधते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो. ती सुद्धा प्रेमाची पावती म्हणून एखादं गिफ्ट घेते. अर्थात ही झाली अलीकडची 'सेलिब्रेशन' करण्याची पद्धत! पूर्वी ओवाळणीत पैसेरुपी आशीर्वाद दिले जात असत. आता मात्र उत्सवापूर्वी 'फेस्टिव्ह वाइब्स' म्हणत बहीण भावाला कोणते गिफ्ट द्यावे यावर मोठी चर्चा केली जाते. ज्याला जास्त बहिणी त्याचा खिसा पार रिकामा होतो. हातावर राख्या मिरवताना छान वाटते पण आर्थिक स्थिती बिचाऱ्या भावाला माहित असते.
भावा-बहिणीच्या या प्रेमळ नात्यासाठी वर्षभरात दोन सण येतात. एक रक्षाबंधन आणि दुसरी भाऊ बीज. यात दोन्ही वेळेस भावानेच भेटवस्तू वा ओवाळणी द्यायची असते असे नाही, तर एकदा बहिणीने आणि एकदा भावाने भेट द्यायला हवी. यामागे आहेत दोन पौराणिक कथा.
रक्षाबंधनाची कथा: कृष्णाचे बोट कापले गेले तेव्हा त्याची बहीण सुभद्रा चिंधी शोधत महालात फिरत राहिली तर मानलेली बहीण द्रौपदीने आपली भरजरी साडी फाडून त्याची चिंधी कृष्णाला बांधली आणि त्याचं रक्षण केलं, त्यामुळेच कृष्णानेही तिला वस्त्रहरणाच्या प्रसंगात छोट्याशा चिंधीची परतफेड न संपणाऱ्या महावस्त्राने केली. तेव्हापासून रक्षाबंधनाला बहिणीने भावाला भेट देण्याची प्रथा सुरु झाली. आणि भाऊबीजेला....
Raksha Bandhan 2025: राखी कोणत्या हातावर बांधावी? उजव्या की डाव्या? ९० टक्के लोक इथेच चुकतात
भाऊबीजेच्या कथा : यमराज दिवाळीनिमित्त आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे जेवावयास गेले होते. यमुनेने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले औक्षण केले, तेव्हा यमराजाने प्रसन्न होऊन हवी ती ओवाळणी माग असे सांगितले. त्यावर यमीने ओवाळणी मागितली, की ''दादा, तुझ्या येण्याने जसा मला आनंद झाला, तशी प्रत्येक बहीण आपल्या भावाची वाट बघत असते. त्यामुळे निदान आजच्या दिवशी तरी भावा बहिणीची ताटातूट होणार नाही, याची काळजी घेशील का? हीच माझी ओवाळणी समजेन मी...!' तिला तो वर यमराजाने दिला. तेव्हापासून भाऊबीजेला भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची पद्धत सुरु झाली.
भेटवस्तू हे निमित्त आहे. प्रेम, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा नसेल तर ती भेट, ओवाळणी ही केवळ वस्तू ठरेल. त्यामुळे जे द्याल ते आपुलकीने द्या, मग ते आशीर्वाद का असेना!