Raksha Bandhan 2025 First Rakhi To Ganpati And Swami: बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असतो. बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारी भान कायम राहावे, यासाठी राखी बांधली जाते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. यंदा २०२५ मध्ये ०९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या अतिशय शुभ सणाला श्री स्वामी समर्थ महाराजांना एक राखी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका' या शब्दाचा अपभ्रंश आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा दृढ विश्वास भाविकांचा आहे. दुःखात जसे स्वामींना आवाहन केले जाते. तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते. स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली, असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत. स्वामींनी केलेल्या उपकारांची जाण ठेवली जाते. अशातच सण-उत्सवांमध्येही स्वामी सेवा सुरू ठेवली जाते. याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी, असे म्हटले जाते. स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया...
अपार कृपेची कृतज्ञता म्हणून एक राशी अवश्य अर्पण करा
सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना तबक तयार केले जाते. ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापाशी जावे. देवांसमोर दिवा लावावा. स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल, तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा. स्वामींना तिलक लावावा. स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षता घालाव्यात, प्रतिमा असेल तर त्यावर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी, मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल, तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी. स्वामींचे औक्षण करावे. स्वामींना मिठाई अर्पण करावी. स्वामींना मनोभावे नमस्कार करावा, असे सांगितले जाते. स्वामी माऊली आहेत. स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळू शकतो. भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. त्याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी बांधावी, असे सांगितले जाते.
एक राखी देवासाठी ठेवली जाते
आपल्याकडे हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे. इष्ट आणि आराध्य देवामुळे आपले आणि घराचे संरक्षण होते. याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणूनच एक राखी देवासाठी ठेवली जाते. प्रथमेश असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी, असे मानले जाते. रामायण, महाभारत, स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद्भागवत पुराण अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो. अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात. स्वामी आपल्यातच आहेत, असे समजून व्यवहार करत असतात. सुख-दुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात. आपापल्या कुळाचार, कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना, स्वामींना राखी अर्पण करावी.