९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन(Raksha Bandhan 2025) आहे. त्यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. अलीकडच्या नव्या ट्रेंडनुसार भाऊ बहिणीला, बहीण बहिणीला, भाऊ भावाला, बहीण वहिनीला राखी बांधते. एकमेकांचे संरक्षण करू, प्रसंगी पाठीशी उभे राहू हा त्यामागचा आशय असावा असे मानले तर यात गैर काहीच नाही. आजची स्त्री शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे ती तीनही बाबतीत संरक्षण देऊ शकते. त्यामुळे हा प्रेमाचा, संरक्षणाचा, आपुलकीचा धागा बहिणीला, वहिनीला बांधला तरी काहीच हरकत नाही, मात्र चूक होते ती राखीचे मनगट निवडताना!
कोणत्या मनगटावर राखी बांधावी?
धागा राखीचा असो वा देवाचा तो पुरुषांच्या उजव्या मनगटावर आणि स्त्रियांच्या डाव्या मनगटावरच बांधला गेला पाहिजे. त्याला शास्त्रीय आधारदेखील आहे. अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल, की स्त्रिया ही प्रकृतीची डावी बाजू आणि पुरुष ही उजवी बाजू आहे. हे दोघे समप्रमाणात ही सृष्टी सांभाळत आहेत. यात कमी जास्त कोणीही नाही. उलट या दोघांच्या ऐक्यामुळे सृष्टीचा समतोल राखला जात आहे. म्हणून स्त्रियांना वामांगी म्हणतात. वाम म्हणजे डावी बाजू. धर्मकार्यातही स्त्री पुरुषाच्या डाव्या बाजूला बसते. म्हणून पूजेचा, रक्षेचा कोणताही धागा बांधताना स्त्रियांच्या डाव्या मनगटाला आणि पुरुषांच्या उजव्या मनगटाला तो बांधावा, अगदी राखीसुद्धा!
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
राखी, कलावा मनगटावर बांधण्याचे काय कारण?
मनगटावर धागा बांधल्याने आपल्या मनगटाच्या नसांवर थोडासा दबाव येतो. आयुर्वेदात या ठिकाणाहून नाडी तपासणी करून माणसाचे आजार शोधले जातात. येथे धाग्यामुळे दाब राखला जातो, ज्यामुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ नियंत्रित करता येतात. मनगटावर धागा बांधल्याने ॲक्युप्रेशर तंत्राचे फायदेही मिळतात. नसांवर हलका दाब पडल्याने थकवा कमी होतो, शरीराला ऊर्जा मिळते आणि विचारांची शुद्धता राहते.