Raksha Bandhan 2025: शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. हा सण संपूर्ण देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो. बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारी भान कायम राहावे, यासाठी राखी बांधली जाते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. रक्षाबंधनदिनी भावाला राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया...
राखी कोणत्या हातावर बांधावी? उजव्या की डाव्या? ९० टक्के लोक इथेच चुकतात
विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. या दिवशी सौभाग्य योग, श्रवण नक्षत्र आणि गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. तसेच अन्यही काही शुभ योग जुळून येत आहेत. रक्षाबंधन श्रावण शनिवारी आले आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून हनुमंतांचे स्मरण, पूजन करावे, असे म्हटले जाते. गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ महाराज तसेच आपल्या आराध्य देवाला आवर्जून एक राखी अर्पण करावी, असे सांगितले जाते. रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे, त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते. शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत असून, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून २४ मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तररात्रौ ०२ वाजून ११ मिनिटांनी पंचक सुरू होत आहे. त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे, असे सांगितले जात आहे.
रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
रक्षाबंधनाला भाऊरायाला राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती?
- रक्षाबंधनाच्या दिवशी सकाली स्नानादी कार्ये उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना दंडवत घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून त्यांचे शुभाशिर्वाद घ्यावेत.
- एका ताटात किंवा ताम्हनात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरांजनही तयार करावे.
- राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी.
- रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.
- राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा.
- रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे.
- कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वादरुपी अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात.
- या विधीनंतर भावाचे औक्षण करावे.
- औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो, असे मानले जाते.
- रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा-बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी.
- भाऊ मोठा असेल, तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा.
- रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभुषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी.
रक्षाबंधनाला राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा?
- येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।
- सिन्दूरं सौभाग्य वर्धनम, पवित्रम् पाप नाशनम्। आपदं हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥, हा मंत्र टिळा लावताना म्हणावा.