पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, त्या स्त्रिसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील(Pitru Paksha 2025) नवमीस पार्वणाविधीने अविधवा नवमी श्राद्ध(Avidhava Navami Shradhdha 2025) करण्याविषयी शास्त्राज्ञा आहे. यावर्षी ही तिथी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी येत आहे. वाचूया सविस्तर माहिती.
अवेहपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना 'सधवा' म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो, तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा 'सधवा' हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवानवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे.
जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल, तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवानवमीचे श्राद्ध, म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल, तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत: करावे.
अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत :
या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालतात. तिला सौभाग्य अलंकार देतात. यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात. तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात.
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण :
साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो. मात्र, संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिच्या इच्छा आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून राहते. तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी, म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एकार्थी स्त्रिच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली, तरीदेखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीदेखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे. यातून लक्षात येते, की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे. त्यांना दुषणे देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृद्धींगत करण्यात धन्यता मानुया!