Pitru Paksha 2025 Masik Shivratri Vrat: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।। चातुर्मासात सुरू असलेला पितृपक्ष सांगतेकडे आला आहे. या पितृपक्षात पूर्वजांचे मनापासून स्मरण केले जाते. श्राद्ध, तर्पण विधी केला जातो. पूर्वजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृपक्षात येणाऱ्या मासिक शिवरात्रीचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. या दिवशी शिवपूजन करून काही मंत्रांचा जप करावा, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
शिवरात्री व्रत हे महादेव शिवशंकर यांना समर्पित आहे. आषाढी देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिर्देत गेल्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचे पालकत्व शंकरांकडे असते. त्यामुळे चातुर्मासात शिवाशी निगडीत व्रतांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते, असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत असते. शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. शिवरात्रि ही महादेवांना समर्पित असलेले व्रत आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी शिवरात्री आहे.
शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत
शिवरात्रीचे व्रत हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते.
पितृपक्षातील शिवरात्री व्रत पूजनाचा सोपा विधी
प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
शिव मंत्र ठरतील उपयुक्त, पुण्य वाढेल
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
शिवरात्रीला शुक्र प्रदोष व्रताचा संयोग
प्रदोष आणि शिवरात्री ही दोन्ही व्रते महादेव शिवशंकरांना समर्पित आहेत. ही दोन्ही व्रते एकाच दिवशी येणे उत्तम योग मानला जातो. प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. शुक्रवारी प्रदोष व्रत आले की, त्याला शुक्र प्रदोष म्हटले जाते. प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥