Pitru Paksha 2025 Gurupushyamrut Yoga: मराठी वर्षातील चातुर्मास काळ सुरू आहे. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या कालावधीत पितृपक्ष असतो. या कालावधीत पितरांच्या नावे श्राद्ध, तर्पण विधी केला जातो. पूर्वजांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना काकबळी ठेवला जातो. देवांप्रमाणे पितरांमध्ये वरदान देण्याची क्षमता असते, असे मानले जाते. पितृदोष असेल, तर पितृपक्षात विशेष विधी करून तो दूर करण्यासाठी उपाय केले जातात. याच पितृपक्षात अत्यंत शुभ मानल्या गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. जाणून घेऊया...
गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. संपूर्ण वर्षात असे काही योग येतात, जे अतिशय शुभ, पुण्य फलदायी ठरतात. त्यातील एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे.
कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ
गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.
लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण महत्त्व
गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.
गुरुपुष्यामृत योगावर नेमके काय करावे?
- गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या वेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्याप्रकारे गुंतवणूक करु शकता.
- गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा. त्यानंतर देवघरात ठेवा.
- गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते. किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो.
- गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधीत महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. अडकले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करता येऊ शकते.
- पैशांशी संबंधित काही समस्या असतील, तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी.
- गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
- पितृपक्षातील गुरुवारी, १८ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुपुष्यामृत योग केवळ ५ मिनिटांसाठी असणार आहे. बुधवारी पुष्य नक्षत्र अहोरात्र असून, गुरुवारी सकाळी ०६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र असणार आहे. भारतीय पंचांग पद्धतीत सूर्योदयाला अत्याधिक महत्त्व आहे. अनेक गोष्टी त्यावरून ठरल्या जातात. गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून २६ मिनिटांनी सूर्योदय होणार आहे.