Vitthal Rukmini Pandharpur Magh Yatra 2025: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. आषाढी आणि कार्तिकी वारीला वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून पंढरपूरला जातात. तर अत्यंत पवित्र आणि शुभ मानल्या गेलेल्या माघ महिन्यात पंढरपूरला यात्रा भरते. याला माघी यात्रा असे म्हटले जाते. या यात्रेच्या निमित्तानेही भाविकांचा जनसागर लोटतो. या माघी यात्रेत भाविकांनी सढळ हस्ते केलेल्या दानामुळे देवस्थानची कोट्यवधी रुपांची कमाई झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माघी यात्रेत उत्पन्न कमी झाले असले तरी अन्यवेळी सणाला तसेच मोठ्या यात्रेच्या काळात देवाच्या पुढे सढळ हाताने भाविक दान देत आहेत. या मिळालेल्या उत्पन्नातून मंदिर समिती दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते. असे असले तरी यंदाही विठुरायाच्या चरणी दान देताना हात आखडता घेतला नाही. माघ यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिरे समितीस ३ कोटी ३ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
माघी यात्रा पावली, विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची बक्कळ कमाई झाली
३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ३२ लाख ३३ हजार ४२० रुपये अर्पण, ८० लाख ३४ हजार १२८ रुपये देणगी, ४० लाख ८१ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ३६ लाख ८३ हजार ९६९ रुपये भक्त निवास, ८ लाख ८८ हजार ८०० रुपये पूजेच्या माध्यमातून, ८६ लाख ४८ हजार १५२ रुपये हुंडीपेटी, १० लाख ३९ हजार ७०७ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाइल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमांतून ६ लाख ९७ हजार ६४० रुपये उत्पन्न मिळाले.
दरम्यान, २०२४ च्या माघी यात्रेत ३ कोटी ५० लाख २२ हजार ५१९ रुपये व या वर्षीच्या यात्रेत ३ कोटी ३ लाख ६ हजार ८१६ रुपये उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत ४७ लाख १५ हजार ७०३ रुपये इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुमारे ४ लाख ५० हजार लाडू प्रसादाची विक्री झाली असून, सुमारे ५२ ग्रॅम सोने व ६ किलो चांदीच्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत.