Vitthal Rukmini Nitya Puja Online Booking: पंढरपूरचा विठुराया हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूर वारी करत लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. तर वर्षभर विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागलेलीच असते. यातच विठुरायाची पूजा करण्याचाही अनेकांचा मानस असतो. यासाठी मंदिर प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने पूजा बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवशी तीन महिन्यांच्या पूजेसाठी बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा बुकिंग करता याव्यात, यासाठी मंदिर समितीने २६ डिसेंबर २०२४ रोजी ऑनलाइन बुकिंगला सुरुवात केली. ०१ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हे बुकिंग होते. पहिल्याच दिवशी देवाच्या सर्व नित्य पूजा बुक झाल्याने आता भाविकांना नित्य पूजेच्या बुकिंगसाठी पुढच्या तीन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. विठ्ठलाला रोज सकाळी होणारी महापूजा अर्थात नित्य पूजेचे आकर्षण जगभरातील भाविकांना असते.
नित्य पूजेतून ५५ लाख रुपयांचे उत्पन्न
या नित्य पूजेत देवाला दही दुधाचे स्नानापासून पोशाखापर्यंत सर्व उपचार केले जातात. या महापूजेच्या बुकिंगसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. विठुरायाच्या नित्य पूजेसाठी २५ हजार तर रुक्मिणी मातेच्या नित्य पूजेसाठी ११ हजार एवढे शुल्क ठरविण्यात आले. बुकिंग सुरू होताच भाविकांनी पहिल्या दिवशी तीन महिन्याच्या सर्व पूजा बुक केल्याने मंदिराला नुसत्या नित्य पूजेतून ५५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पाद्यपूजा, तुळशी पूजा यासाठीही मोठ्या संख्येने बुकिंग झाले. अजूनही पाद्यपूजा व तुळशी पूजेच्या काही बुकिंग शिल्लक असून भाविकांना याचे घर बसल्या बुकिंग करता येणार आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.