Swami Samarth Punyatithi April 2025 Shivratri Vrat: चैत्र महिन्याची सांगता होताना शुभ व्रतांचा अद्भूत योग जुळून आला आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात मासिक शिवरात्रिचे व्रत आचरले जाते. चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्रि शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी आहे. याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे या एकाच दिवशी शिवकृपा आणि गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी असल्याचे सांगितले जात आहे. शिवरात्रिचे व्रत कसे आचरावे? शिवरात्रिचे व्रत करताना स्वामी सेवा कशी करावी? जाणून घेऊया...
शिवरात्रिचे व्रत महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शिवरात्रि व्रत करण्याची सोपी पद्धत
शिवरात्रि व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवांच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक, रुद्राभिषेक करावा. मंदिरात जाणे शक्य नसेल, तर घरी महादेव शिवशंकाराचे पूजन करावे. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. तसेच यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते.
शिवरात्रिला स्वामी सेवा करणे शुभ
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी शिवरात्रि असून, या दिवशी स्वामी सेवा करणे शुभ मानले जात आहे. या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पद्धतीने पारायण करावे. 'श्री स्वामी समर्थ' हा जप १०८ प्रमाणे ११ जप माळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा. स्वामींचा तारक मंत्र म्हणावा.