श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांकडून मंगळागौरीचे(Mangalagauri vrat 2025) व्रत केले जाते. सुवासिनी स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत हे व्रत करतात. वटसावित्रीप्रमाणे हे व्रतही सौभाग्यदायक असून त्यायोगे पतीचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे. हे व्रत पहिल्या वर्षी माहेरी आणि पुढची चार वर्षे सासरी करतात. तसेच हे सौभाग्यदायी व्रत विवाहित महिलांनाही करता येते.
हे ही वाचा : मंगळागौरीला घ्या सोपे उखाणे
मंगळागगौरीची पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा. पती-पत्नी दोघांतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठीच ही पूजा केली जाते.
मंगळागौरीची व्रत कथा :
धनपाल वाण्याला मूल नव्हते. त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येत असे. पण अपत्यहीन वाण्याकडची भिक्षा नाकारून तसाच परत जाई. एकदा वाण्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या गोसाव्याला भिक्षा वाढली. त्यामुळे गोसावी रागावला. परंतु वाण्याच्या बायकोने क्षमायाचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचवला.
त्यानुसार निळ्या घोडीवर निळा पोशाख करून वाणी वनातून जात असताना जिथे घोडा अडला, तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले. पार्वतीमातेला त्याने आपली व्यथा सांगितली. पार्वतीमातेने त्याला दीर्घायुषी आंधला अथवा गुणी पण अल्पायुषी या दोघांपैकी कसा मुलगा हवा ते विचारले. त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्पायुषी मुलगा चालेल असे सांगितले. मग देवीने त्याला देवळाच्या पाठच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून तो पत्नीला खाऊ घालण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्या वाण्याने एक आंबा पत्नीला नेऊन दिला. तिने तो खाल्ला. पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचे नाव शिव ठेवले. यथाकाल त्याची मुंज केली. तो दहा वर्षांचा असतानाच त्याला मुली सांगून येऊ लागल्या. तो ससेमिरा चुकवण्यासाठी मग वाण्याने मामासह शिवाला काशीयात्रेला पाठवले.
वाटेत एका नगरातील बागेजवळून जाताना लहान मुलींचे भांडन होत होते. ते मामांनी ऐकले. त्यातील एका मुलीने सुशीला नावाच्या दुसऱ्या मुलीला काही अपशब्द ऐकवला. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, 'माझ्या आईने गौरीव्रत केल्यामुळे मी कधीच विधवा होणार नाही.' हे ऐकून शिवाच्या मामाने या मुलीशी शिवाचे लग्न लावून द्यायचे असे ठरवले. पुढे यथाकाल अडचणींना सामोरे जात त्यांचा विवाह, वियोग आणि पुनर्मिलन होते.
असे हे गौरीव्रत करून आपले आयुष्य मंगलमयी करावे व सौभाग्य, सद्भाग्य प्राप्त करून जीवन आनंदाने व्यतीत करावे, हे सांगणारी मंगळागौरीची कथा सुफळ संपूर्ण!
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
मंगळागौरीचा पूजा विधी -
मंगळागौरीच्या व्रतात शिव व गणपती यांच्यासह गौरीची पूजा करतात. पूजेसाठी चौरंग मांडतात. त्याला केळीचे खुंट बांधून मखर तयार करतात. ते फुलांनी सजवतात. त्या भोवती रांगोळी काढतात. पूजेला लागणारे साहित्य तयार करून ठेवतात.
या पूजेत १६ संख्येचे विशेष महत्त्व आहे. सोळा प्रकारची पत्री, सोळा प्रकारची फुले आणि पुरणाचे सोळा दिवे यांसह षोडशोपचारे गौरीची पूजा केली जाते. तसेच गौरीसाठी पुरणाचे अलंकार केले जातात. त्यात दागिने, हार, गजरा, भातुकली, फणी असे प्रकार पुरणापासून बनवले जातात व पूजा करतेवेळी गौरीला अर्पण केले जातात.
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!|
या पूजेत अंगपूजा, पत्रीपूजा, पुष्पपूजा अशा अंगभूत पूजा असतात. मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या मुली न्हाऊन माखून पूजेला बसतात. पूजेकरता पुरोहित बोलावून यथासांग पूजा केली जाते. मंगलारती झाल्यावर कहाणीवाचन केले जाते.
आपल्या मातेस व मातेसमान असलेल्या उपस्थित सर्व महिलांना नमस्कार केला जातो. फराळ दिला जातो. सुवासिनींना हळद कुंकू, काजळ, करंडा, फणी, तांदूळ, खण, नारळ, सुपारी व दक्षिणा यांनी युक्त असलेले ताट दिले जाते. पुरोहितांना दक्षिणा दिली जाते.
या व्रतात मौनाचे महत्त्व आहे. पूजा करते वेळी मौन पाळून भक्तीपूर्वक देवीला शरण जावे, हा त्यामागील हेतू असतो. पूजा झाल्यावर सुवासिनीसमवेत आप्त नातलग मिळून स्नेहभोजन करतात. त्यावेळी ज्या वशेळ्या अर्थात नवीन लग्न झालेल्या आणि पूजेला बसलेल्या मुलींना विडा आणि दक्षिणा दिली जाते. हे सर्व होईपर्यंत मौन पाळायचे असते. जेवून तुळशीचे पान खाऊन मगच मौन सोडायचे असा या पूजेचा नेम असतो. गप्पा गोष्टींमध्ये चित्त विचलित होऊ नये व पूजेप्रती समर्पण भाव असावा यासाठी मौनाचे महत्त्व सांगितले आहे.
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
रात्रीच्या वेळी सोळा काडवातींनी मंगलारती केली जाते. शिवगौरीच्या गुणगौरवाची, महिम्याची गीते, फुगड्या, गाणी, भेंड्या, आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेणे, असे नानाविध कार्यक्रम करून हसत खेळत मंगळागौर जागवली जाते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेनंतर गौरीचे विसर्जन केले जाते.
मंगळागौरीची आरती :
जय देवी मंगळागौरी ॥ ओवाळीन सोनियाताटी ॥ रत्नांचे दिवे ॥ माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥ ध्रु० ॥
मंगळमूर्ती उपजली कार्या ॥ प्रसन्न झाली अल्पायुषी ॥ राया तिष्ठली राजबाळी ॥ अहेवपण द्यावया ॥ जय ० ॥ १ ॥
पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥ सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥ सोळा परीची पत्री ॥ जाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥ ध्रु० ॥
पारिजातकें मनोहरे ॥ गोकर्ण महाफुले ॥ नंदेटें तगरें ॥ पूजेला ग आणिली ॥ जय० ॥ २ ॥
साळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥ अळणी खिचडी रांधिती नार ॥ आपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥ जय० ॥ ३ ॥
डुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥ कळावी कांकणे हाती शोभाती ॥ शोभती बाजुबंद ॥ कानी कापांचे गबे ॥ ल्यायिली अंबा शोभे ॥ जय० ॥ ४ ॥
न्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥ पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥ स्वच्छ बहुत होउनी ॥ अंबा पूजूं बैसली ॥ जय० ॥ ५ ॥
सोनियाचे ताटी ॥ घातिल्या आता ॥ नैवेद्य षड्रसपक्वान्ने ॥ ताटी भरा मोदे जय० ॥ ६ ॥
लवलाहे तिघे काशी निघाली ॥ माऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥ मागुती परतुनिया आली ॥
अंबा स्वयंभू देखिली ॥ देऊळ सोनियांचे ॥ खांब हिरेयांचे ॥ वरती कळस मोतियांचा ॥ जय० ॥ ७ ॥