Mahashivratri 2025 Shiv Puja Rules In Marathi: महाशिवरात्री म्हणजे महादेव शिवशंकराच्या भक्तांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला दिवस होय. आपल्याकडे शिवपूजन आसेतुहिमाचल सर्वत्र रूढ आहे. शिवोपासना सर्व राज्यांमध्ये चालते अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे माहात्म्य वर्णिले गेले आहे. वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न भिन्न नावांनी संबोधिले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतन राहिलेले आहे. शिव किंवा रूद्र हा सृष्टीचा संहारकर्ता आहे. प्रत्येक महिन्यात शिवरात्रि व्रत असते. परंतु, माघ महिन्याती शिवरात्रि महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवांचे विशेष पूजन केले जाते. शिव पूजन करताना आपल्या हातून काही चुका तर होत नाहीत ना, याची काळजी घेऊन नियम पाळणे आवश्यक मानले गेले आहे.
रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. जेव्हा निशीथकाळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला निशीथकाल २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०१ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात. शंकर हा महायोगी, पण अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे, असे मानले जाते.
बेलपत्राशिवाय शिवपूजन अपूर्ण
काही मान्यतांनुसार, कोणतीही गोष्ट शंकराला अर्पण करताना काळजी घ्यावी. बेलपत्राशिवाय कोणताही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये. फूले, नैवेद्य हा शिवलिंगासमोर अर्पण करावा. शिवलिंगावर अर्पण केलेला नेवैद्य ग्रहण केला जात नाही, अशी मान्यता आहे. हा पूजेतील दोष समजला जातो, असे सांगितले जाते. तसेच बेलपत्राशिवाय शिवपूजन अपूर्ण मानले जाते. बाकी काही करणे शक्य झाले नाही, तरी एक बेलपत्र मनोभावे शिवाला अवश्य अर्पण करावे, असे केल्याने संपूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे.
प्रदोष काळात अभिषेक करू नये
महादेवाच्या कोणत्याही मंदिरात अभिषेक करताना वा जल अर्पण करताना काही संकेत पाळावे लागतात. शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये, असे सांगितले जाते. शास्त्राप्रमाणे शंकरावर सकाळच्या प्रहरीच अभिषेक करावा, असे सांगितले जाते. तर, शिवपूजनावेळी चुकूनही शंखाचा वापर करू नये. शंकराने शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो. त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा.
बेलपत्रासह शंकराला अर्पण करा विविध प्रकारच्या पत्री
शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा. मात्र, या अक्षता या निरखून, पारखून घ्याव्यात. भंग पावलेल्या अक्षता पूजनावेळी वापरू नयेत. भंग पावलेला तांदळाचा दाणा हा अपूर्ण आणि अशुद्ध असतो, त्यामुळे त्याचा वापर टाळावा. शिवपूजन करताना केसर, दुपहरिका, मालती, चम्पा, चमेली, जुई या फुलांचा वापर करू नये. याऐवजी बेलाची पाने, भांगाची पाने, धोत्र्याची पाने, घोंगलाची पाने, निळी कमळे, अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वहावीत.
शिव मंदिरात प्रदक्षिणा घालताना ठेवा भान
महादेवाच्या मंदिरातील प्रदक्षिणा आणि अन्य मंदिरातील प्रदक्षिणा यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. शंकराच्या मंदिरातील प्रदक्षिणा कधीही वर्तुळाकार पूर्ण करावयाची नसते. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी, बाहेर पडणारा मार्ग कधीही ओलांडू नये. शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते. त्यामुळे हे जल लांघणे अनुचित असते. त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष ठेवावे.