Magh Surya Shashti 2025: मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. माघ महिन्यात वसंत पंचमी झाली की, माघ शुद्ध षष्ठी तिथीला सूर्यषष्ठी म्हटले जाते. या दिवसापासून सूर्योपासनेचा संकल्प करून काही गोष्टींचा आवर्जून नियमित अवलंब केल्याच भरघोस लाभ, अनेक फायदे प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
सूर्याकडे शाश्वत ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणून पाहिले जाते. सूर्योपासनेमुळे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आपण शरीराने स्वस्थ, मनाने सम व बुद्धीने जागृत होतो. माणसाचे शरीर सशक्त तसेच मेहनत करणारे असले पाहिजे. शरीर निरोगी असेल, तरच अन्य भौतिक सुखांचा उपभोग घेता येईल. सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना असली, तरी तो सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. सूर्य उपासनेमुळे बुद्धी तेजस्वी बनते. सूर्याचे मंत्र म्हणत नमस्कार घालावेत. आबालवृद्धांसाठी ही उपासना आशीर्वादरूपी आणि आरोग्यवर्धक आहे.
सूर्योपासना आणि सूर्यपूजन याचे विशेष महत्त्व
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्याला सिंह राशीचा स्वामी मानले जाते. सूर्याचा ग्रह म्हणून सर्व राशींवर काही ना काही प्रभाव पडत असतो. सूर्य हा करिअर, सुख, समृद्धी, प्रगती यांचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे सूर्योपासना आणि सूर्यपूजन याचे विशेष महत्त्व आहे. वैज्ञानिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पातळीवर सूर्याचे महत्त्व अगदी भिन्न असले, तरी सूर्योपासना केल्याचा आरोग्यदायी आणि ज्योतिषीय दृष्टीने माणसाला विशेष लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते.
सूर्यपूजन विशेष शुभ फलदायक सिद्ध होऊ शकते
एहि सूर्य! सहस्त्रांशो! तेजो राशे! जगत्पते!अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाकर!
हे सूर्य देवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे, असा संकल्प करून सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवतेची कृपा मिळवण्यासाठी विशेष दिवसाची आवश्यकता असते, असे नाही. सूर्योपासना आणि सूर्यपूजन विशेष शुभ फलदायक सिद्ध होऊ शकते, अशी मान्यता आहे. शक्य असल्यास नियमितपणे एका तांब्यात जल, तांदूळ, आणि लाल फूल घेऊन सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे सूर्याचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.
सूर्याचे प्रभावी मंत्र
'ॐ तत्सविर्तुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धीयो यो न: प्रचोदयात' हा सूर्य गायत्री उपासना मंत्र आहे. 'ॐ सूर्याय नम:', 'ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः', 'ॐ घृणि: सूर्यादित्योम' और 'ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय: नम:', अशा सूर्य मंत्राचा जप करावा. मात्र, सूर्योपासना किंवा सूर्यपूजन ही केवळ दिवसाच्या पहिल्या प्रहरातच करावी, असे सांगितले जाते. सूर्योदय होतो, तेव्हा सूर्य शांत असतो, यानंतर तो अधिक उष्ण होत जातो, त्यामुळे सूर्योदयाचा कालावधी हा सूर्यपूजन वा सूर्योपासनेसाठी उत्तम मानला जातो, असे सांगितले जाते.
निष्काम कर्मयोगाचा मोठा परिपाठ सूर्याकडून मिळतो
सूर्योपासनेने बुद्धी तेजस्वी आणि प्रतिभासंपन्न होते. सूर्य जगाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही आणि मोबदल्यात कोणाची उपेक्षाही करत नाही. प्रामाणिकपणे, अविरतपणे आणि तितक्याच तेजाने रोज उगवतो आणि मावळतो. परंतु जाण्याआधी संपूर्ण सृष्टीला जीवनदान देऊन जातो. निष्काम कर्मयोगाचा मोठा परिपाठ सूर्याकडून मिळतो, म्हणून त्याची नित्य उपासना करावी. रोज नित्यनेमाने आपले काम करणाऱ्या व्यक्तीला वेळेची कमतरता कधीच जाणवत नाही.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.