शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

BLOG: ब्रह्मांडनायक दत्तगुरुंचे दैवी शिष्योत्तम, तेजस्वी परंपरा अन् लोकोद्धाराचा अखंडित वसा

By देवेश फडके | Updated: December 14, 2024 11:06 IST

Datta Jayanti: दत्त जयंतीच्या निमित्ताने काही प्रमुख दैवी शिष्य जे स्वतः गुरुपदाला देवपदाला पोहोचले, त्यांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया...

Datta Jayanti: दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरुंचे स्वरुप, दत्तावतार, दत्त संप्रदायाची परंपरा अशा काही गोष्टींचा आढावा आपण घेत आहोत. लिहिण्यासारख्या आणि सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात अनेक पंथ, संप्रदाय झाले आणि त्यांची परंपरा अव्याहत, अखंडितपणे आजतायागत सुरू असल्याचे पाहायला मिळते. या सर्वच परंपरांनी अध्यात्म, तत्त्वज्ञान, आचार-विचार, त्याग, समर्पण, विवेकबुद्धी, ममत्व, ध्यास, खरेपणाची मुळे अतिशय घट्ट रुजवून ठेवून लोकोत्तर संत, महंत आणि सत्पुरुषांच्या माध्यमातून लोकोद्धार, समाज उन्नती, बंधुत्व, समता, समानता, संस्कार, मूल्ये यांचा कल्पवृक्ष कायम तरतरीत, बहरलेला आणि शुद्ध ठेवण्याचे काम केल्याचे पाहायला मिळते. यात दत्त संप्रदायही आलाच. दत्तगुरुंनी विविध अवतार घेतले, तसेच प्रत्येक अवतारावेळी शिष्यांची मोठी परंपरा निर्माण केली. प्रत्यक्ष दत्तगुरु, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ यांचे अनेक शिष्योत्तम होऊन गेले. श्री स्वामी समर्थ महाराज हे तुलनेने अलीकडच्या काळातील असल्याने त्यांचे शिष्य किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने पुनित झालेले अनेक जण अगदी लगतच्या काळातील आहेत. या सर्वांनी गुरुपरंपरा, संस्कृती, संस्कार, लोकोद्धाराचे सद्गुरुंचे काम प्रयत्नपूर्वक, अखंडपणे कायम ठेवले. अशाच अगदी मोजक्या दैवी शिष्यांचा अल्प परिचय आपण आता जाणून घेऊया...

दत्तगुरु, दत्तावतार किंवा दत्त संप्रदायातील आपल्या अवतारकार्यात जात-पात-धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी विश्व उद्धाराचे कार्य केले. या सर्वांची शिकवण, उपदेश, बोध हे समाजाला एक प्रकारे मार्गदर्शन करणारे ठरले. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्णावतार मानले जातात. स्वामींचा शिष्यपरिवारही मोठा आहे. यापैकी गजानन महाराज, शंकर महाराज आणि साईबाबा या दैवी शिष्यांच्या अवतारकार्याचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते. 

अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादिकालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त!

‘गण गण गणात बोते’चा सिद्धमंत्र देणारे गजानन महाराज

संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरावाचून कोणीही तारणहार नाही, हे ईश्वरीतत्त्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म, भक्ती, योग हे तीन मार्ग सांगितले आहेत. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. गजानन महाराजांनी अनेक रंजले - गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले, असा उल्लेख तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी लिहिलेल्या एका पोथीत आढळून येतो. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. ‘गण गण गणात बोते’ अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. ‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे, असे सांगितले जाते. ‘गण गण गणात बोते’ मधील पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही.भाद्रपद शुद्ध पंचमी, ०८ सप्टेंबर १९१० रोजी गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले. 

दत्तगुरुंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ! ३० वर्षांचे अवतारकार्य अन् कालातीत महती

साईबाबा एक दिव्य सत्पुरुष

साईबाबा शेगावच्या गजानन महाराजांना आपले गुरुबंधू मानत असत. गजानन महाराज समाधिस्त झाले, त्या दिवशी साईबाबांनी स्वतः त्या उपस्थित भक्तांना सांगितले की, आज सुबह मेरा भाई जाता रहा, माझा जीव चालला, मोठा जीव चालला, असे म्हणत तीव्र शोक व्यक्त केला होता. यासंदर्भातील काही दाखले उपलब्ध आहेत. संत साईबाबा योगारूढ पुरूष असून निराकार परमेश्वराचे साकार रूप होते. साईबाबा समाजाचे उत्कृष्ट शिक्षक होते. आईच्या मायेने ते उपदेश करीत. त्यांचा भक्त वाईट मार्गाला लागला तर त्याला ते सन्मार्गाला लावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते अध्यात्माचे महान तत्वज्ञान सांगत. कधी कधी गोष्टी सांगूनही ते लोकांना उपदेश करीत. परमार्थात गुरूवर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर परमार्थ सफल होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळते. कोणतीही गोष्ट झटपट मिळत नाही; त्यासाठी धैर्य धारण करावे लागते. प्रत्येक गोष्टीकरिता तपश्चर्या करावी लागते. योग्य वेळेची वाट पहावी लागते. साईबाबांचे त्यांच्या भक्तांवर फार प्रेम होते. १९१८ सालच्या विजयादशमीला हे भक्तवत्सल महापुरुष समाधीस्त झाले.

जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!

‘मैं कैलास का रहनेवाला हूं’ म्हणणारे शंकर महाराज

श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमीला इ.स.१७८५ साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच 'शंकर' नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत. मैं कैलास का रहनेवाला हूं, असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी भाविकांची परिस्थिती होऊन जाते. शंकर महाराज अवतारी पुरुष होते. सद्गुरु श्री शंकर महाराज अष्टावक्र होते, त्यांचा डावा पाय मोठा तर उजवा पाय लहान होता. ते म्हणत की, डावा पाय स्वामींचा व उजवा पाय माझा आहे. शंकर महाराजांची मंदिरे, मठ अनेक ठिकाणी आहेत. शंकर महाराज यांना मानणारा, त्यांची भक्ती करणारा वर्गही मोठा आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे नामस्मरण, उपासना करणारे भाविक देश-विदेशात असल्याचे सांगितले जाते. कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक जण सांगतात. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत " सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरुंचा अवतार, अशीही प्रचलित मान्यता असल्याचे सांगितले जाते. शंकर महाराज हे श्री दत्तगुरुंचा तिसरा अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानत असत. शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत. सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून भाविक स्तिमित होऊन जात असे. स्वामी समर्थ महाराजांनी अवतारकार्यांची सांगता करण्यापूर्वी आपला वारसा शंकर महाराजांकडे दिल्याचे म्हटले जाते. २४ एप्रिल १९४७ वैशाख शुद्ध अष्टमी रोजी श्री शंकर महाराजांनी समाधी घेतली. 

हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी

नवनाथ आणि नाथ संप्रदाय

नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. ‘नाथ’ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला ‘नाथ संप्रदाय’ असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर ‘नाथ’ हा शब्द जोडता येतो. नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. गुरू मच्छिंद्रनाथाना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून गुरू मच्छिंद्रनाथानी संजीवनी मंत्राची दीक्षा मिळवून घेतली. व नंतर ही दीक्षा गुरू गोरक्षनाथाना देण्यात आली. चुकीचा वापर होऊ नये म्हणून संजीवनी मंत्राची दीक्षा नाथानी गुप्त स्वरूपात ठेवली. श्री शिवशक्ती - महादेव व आदिशक्ती व श्रीहरि विष्णू नारायण आणि श्री दत्तगुरू व श्री हरी विष्णू नारायण नवनाथ (नवनारायण) आणि वैष्णोवी देवी धाम येथील भैरवनाथ हे नवनाथ यांचे अग्रज मानले जातात. नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. भारतात आणि महाराष्ट्रात या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबंधित होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ यांच्याकडून मिळाली. शिवशक्ति आणि दत्तात्रेय ही नाथ संप्रदायातील महत्त्वाची दैवते होत. त्र्यंबकेश्‍वरला गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ, चरपटीनाथ असे नवनाथ होत.

गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त!

याशिवाय अनेक सप्तपुरुष, योगी, महंत दत्तगुरु, दत्तावतरांच्या कृपेने पुनित झाले आहेत. गुरुचरित्र हा ग्रंथ जसा अद्भूत आहे, त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, स्वामी समर्थ महाराजांचा गुरुलीलामृत, गजानन महाराजांचा श्री गजानन विजय, साईबाबांचा साई सच्चरित्र, शंकर महाराजांचे चरित्र भक्तांसाठी तारक ग्रंथ आहेत. याची प्रचिती लाखो भाविकांनी घेतलेली आहे. तसेच दत्तगुरु, दत्तावतार आणि परंपरा पुढे सुरू ठेवणाऱ्या दैवी शिष्यांवर पुष्कळशी ग्रंथ संपदा आज उपलब्ध आहे. अनेकांनी स्तोत्रे रचली आहेत. असंख्य मंत्र आहेत, अनेकांनी अभ्यासपूर्ण रचना केलेल्या आहेत, आरत्या, श्लोक यांचे भांडार खुले करून दिले आहे. अनेक भक्तांनी आपले स्वानुभव शब्दबद्ध करत आगामी काळातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक करून ठेवले आहेत. या सगळ्यांना केवळ स्पर्श करणेही एका जीवनात शक्य नाही. त्यामुळे आपल्या गुरुंना सर्वस्व मानून, त्यांची शिकवण, बोध, मार्गदर्शन यांचा अवलंब करावा आणि नेहमी चांगल्या गोष्टींची कास धरून मार्गक्रमण करीत राहावे. हीच त्या ब्रह्मांडनायक दत्तगुरुंना खरी गुरुदक्षिणा ठरेल. 

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 

- देवेश फडके.

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुGajanan Maharajगजानन महाराजshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकsaibabaसाईबाबा