जया एकादशी (Jaya Ekadashi 2025) ही नावाप्रमाणेच जय, यश, कीर्ती मिळवून देणारी एकादशी आहे. यंदा हे व्रत ८ फेब्रुवारी २०२५ रोजी करायचे आहे. जे भाविक एकादशीचा उपास नेहमीच करतात त्यांना या व्रताचा अनुभव माहीत असेलच. हे व्रत भक्ती भावाने केले तर ईश्वरकृपा होतेच. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. त्यानुसार फळही मिळते. जया एकादशीचाही महिमा तसाच आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करता येईल? ते जाणून घेऊ.
पालघरचे ज्योतिष अभ्यास सचिन मधुकर परांजपे लिहितात, 'शनिवारी सूर्योदयापासून रात्री झोपेपर्यंत आपण “श्रीशाश्वत” या श्रीविष्णुंच्या एका नामाचा जप करायचा आहे. तुमची नैमित्तिक पूजाअर्चा, साधना वगैरे करायची आहेच. हे नाम या एकाच एकादशीपुरते विशेष जप नाम आहे. याचा जितका अधिकाधिक जप होईल तेवढे उत्तम!'
फक्त सातत्याने मनातल्या मनात श्रीशाश्वत श्रीशाश्वत.... असा जप करणे अपेक्षित आहे. या नामाला आधी ॐ किंवा नंतर नमः वगैरे काही लावायचे नाही. कोणतेही म्हणजे अक्षरशः कोणतेही बंधन नाही. जी मंडळी एकादशी उपवास करत नाहीत त्यांनीही या नामाचा जप करावा, फक्त उद्याचा संपूर्ण दिवस मद्यपान, मांसाहार, व्यसने, तांदूळ, भगर, तांदळाचे पदार्थ, कांदा लसूण यांचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. ब्रह्मचर्य पालन करावे.'
व्रत म्हटल्यावर नियमांची चौकट आलीच. अर्थात ती जाचक नसून आपल्याच भल्यासाठी असते. उपरोक्त घातलेली बंधने ही केवळ आहार-विहारावर घातलेली बंधने नाहीत तर, त्यामुळे आपोआपच मनावर बंधन येते. विषय सुखात गुंतलेले मन ईश्वर चरणांशी रत होते. त्यासाठी नियम पाळायला हवेत. यश, कीर्ती, संपत्ती मिळावी, यासाठी प्रामाणिक कष्टांबरोबरच उपासनेचीही जोड लागते.
जया एकादशीच्या निमित्ताने आपले दैनंदिन काम सांभाळून, विष्णू चरणांशी मन गुंतवून दिलेली उपासना करूया. ही उपासना अतिशय सोपी आहे. त्यासाठी जप माळ अथवा एकाजागी बसून उपासना करण्याचीही गरज नाही. त्यामुळे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही. फक्त दिलेला मंत्र दिवसभर आठवण झाली की मनातल्या मनात सुरु करा आणि दिवसभरात किती नाम जप केला हे मोजत न राहता केलेली सेवा विष्णूंच्या चरणी मनोभावे अर्पण करा.