मातापित्याच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत लग्नाळू मुला-मुलीचे लग्न लावणे सक्तीचे असते का?वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:32 PM2021-09-24T14:32:55+5:302021-09-24T14:36:41+5:30

धर्मशास्त्राचा आणि वैचारिक परंपरा व संस्कृती यांचा कुठलाही आधार नसताना समाजात ज्या घातक गैर प्रथा प्रसृत होतात, त्यात वरील ...

Is it compulsory to marry a young child within a year after the death of the parents? Read! | मातापित्याच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत लग्नाळू मुला-मुलीचे लग्न लावणे सक्तीचे असते का?वाचा!

मातापित्याच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत लग्नाळू मुला-मुलीचे लग्न लावणे सक्तीचे असते का?वाचा!

googlenewsNext

धर्मशास्त्राचा आणि वैचारिक परंपरा व संस्कृती यांचा कुठलाही आधार नसताना समाजात ज्या घातक गैर प्रथा प्रसृत होतात, त्यात वरील रुढीचा समावेश होतो. लग्नासारखा आयुष्यभराचा निर्णय अशा प्रथांमुळे घाईगाईत घेतला जातो व त्याची किंमत अनेकदा नवदांपत्याला आणि पर्यायाने दोन्ही कुटुंबांना भोगावी लागते. एकमेकांची पसंती नाही, परस्पर आकर्षण नाही, एकमेकांना समजून घेणे नाही, विचारांचे आदान प्रदान नाही, या सगळ्या महत्त्वाच्या पायऱ्या वगळून केवळ वर्षश्राद्धाच्या आत लग्न लावून देण्याचा घेतलेला निर्णय दोन जीवांचे आयुष्य उध्वस्त करणारा ठरू शकतो. म्हणून असे मोठे निर्णय आतेतायीपणा करून घेणे योग्य नाही. खुद्द धर्मशास्त्रानेही अशा निर्णयांना पुष्टी दिलेली नाही. 

वास्तविक, निधन पावलेल्या व्यक्तीला किमान एक वर्षभर प्रेतत्व असल्यामुळे पितृत्वाचे अधिकार येत नाहीत. यास्तव ते वर्ष लाक्षणिक अशौच मानले जाणे इष्ट आहे व सद्यकालीन ते मानले जाते. त्या कालावधीत नित्य, नैमित्तिक, कुळाचार, कुळधर्म व व्रताचार करणे अपरिहार्य ठरते. ते मुळीच टाळता येत नाहीत. पण ज्या कर्मासाठी पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध करणे आवश्यक असते, ते कार्य निदान वर्षसमाप्तीपर्यंत तरी करू नये. 

पर्यायी व्यवस्था 

त्यातही अगदी निकड असल्यास व चैत्र महिना समीप नसल्यास निधन पावलेल्या व्यक्तीची षोडशमासिकश्राद्धे व अब्दपूर्तीश्राद्ध करून घ्यावे. हा पर्याय त्यांच्यासाठी, ज्यांचे लग्न आधीपासून ठरलेले आहे किंवा नजीकच्या पुढच्या काळात लग्न करणे शक्य नाही किंवा ज्यांचे वय वाढत चालले आहे आणि अशात आणखी वर्षभर थांबून चांगले स्थळ गमवायचे नाही, कोणी परदेशात स्थायिक असून त्यांना पुढची एक दोन वर्षे मायदेशी येणे शक्य नाही, अशा सगळ्या परिस्थितीत सहा महिने मासिक श्राद्ध करून मंगलकार्य करता येते. याला तडजोडही म्हणता येईल. परंतु ती नक्कीच धर्मशास्त्राला धरून असेल. या विधीनंतर घरात लग्न, मुंज, वास्तुशांती, नूतनव्रतारंभ इ. कार्ये करता येतात. अन्यथा एक वर्ष पूर्ण झाल्यावर या कार्यांचे आयोजन करावे.

'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

वर्षाच्या आत किंवा तीन वर्षानंतर मंगलकार्य?

ही आणखी एक चुकीची प्रथा लोकांनी निर्माण केली आहे. त्यालाही शास्त्राधार नाही. त्यामुळे फार तर एक वर्षभर लग्नकार्य किंवा इतर मंगलकार्य थांबवावे अन्यथा वरील पर्याय निवडावा, मात्र तीन वर्षे थांबणे हे पूर्णपणे शास्त्राविरुद्ध वर्तन आहे, हे लक्षात घ्यावे. 

मग या प्रथा नेमक्या निर्माण झाल्या तरी कशा?

अर्थातच, लोकांमधून! एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात त्या व्यक्तीची पोकळी निर्माण होते. उणीव भासते. घरावर नैराश्य पसरते. अशात घरातील लग्नायोग्य मुला-मुलींच्या लग्नाची बोलणी करून मंगलकार्याने घरावरचे दु:खं-दैन्य दूर व्हावे, अशी नातेवाईकांची त्यामागील भावना असते. तसेच एखाद्या मुलाचे आई-वडील गेल्यावर एकाकी पडलेल्या मुलाला किंवा मुलीला, संसार विरस वाटू नये, म्हणूनही त्याचे नातेवाईक त्यांना बोहल्यावर चढवतात आणि प्रपंचात अडकवून देतात. 

पूर्वी या गोष्टी सर्रास घडत असत. कारण तेव्हा ठरवून केलेली विवाहपद्धती अशाच प्रकारची असे. मात्र, आताच्या काळात मुले मुली परस्परांना जाणून घेतल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेत नाहीत. ते एकार्थी योग्यच आहे. लग्न होऊन काडीमोड घेण्याची वेळ येण्यापेक्षा लग्नाआधी वेळ घेणे केव्हाही चांगले. 

जाणारी व्यक्ती निघून जाते. परंतु मागे राहिलेल्या व्यक्तींवर चुकीच्या प्रथा थोपवून त्यांच्या आयुष्याचे चुकीचे निर्णय घेणे योग्य नाही. शास्त्रदेखील त्याला दुजोरा देत नाही. म्हणून कोणीही अशी घाईगर्दी करत असेल, तर त्यांना ठणकावून सांगा...अशा प्रथेला शास्त्राधार नाही!

Web Title: Is it compulsory to marry a young child within a year after the death of the parents? Read!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.