मृत्यूच्या सावटाने दिली जगण्याची प्रेरणा; कशी? वाचा ही बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 10, 2021 04:08 PM2021-03-10T16:08:03+5:302021-03-10T16:08:20+5:30

ज्याअर्थी सगळे जण वाचले, त्याअर्थी आज आपला मृत्यू निश्चित! परंतु...

The impulse to live given by death How so Read this parable! | मृत्यूच्या सावटाने दिली जगण्याची प्रेरणा; कशी? वाचा ही बोधकथा!

मृत्यूच्या सावटाने दिली जगण्याची प्रेरणा; कशी? वाचा ही बोधकथा!

googlenewsNext

एकदा काही प्रवासी एका प्रवासी बसमधून तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागले होते. गप्पा, गोष्टी, गाणी, भजन, कीर्तन, खाऊ, थट्टा, मस्करी करत प्रवास मजेने सुरू होता. सगळे जण इतके रमले होते, की रात्र होऊनही कोणाच्याही डोळ्यावर झोप नव्हती. 

एकाएक वादळ सुरू झाले. सोसाट्याचा वारा सुटला. बसची गती आपोआप धिमी झाली. ड्रायव्हर प्रखर लाईटच्या प्रकाशात सांभाळून गाडी चालवत होता. अचानक वीज कडाडली. पावसाळी ऋतू नसूनही अवकाळी पाऊस सुरू झाला. वीजांचा कडकडाट, लखलखाट आणि निसर्गाचे एकूणच रौद्र रूप पाहून बसमधले प्रवासी घाबरल़े सगळे जण देवाचा धावा करू लागले. एक दोनदा तर वीज येऊन बसच्या पायथ्याशी कोसळली. थोडक्यात सगळे बचावले. ड्रायव्हरने बस थांबवली.

तो प्रवाशांसमोर आला आणि म्हणाला, पुढचा प्रवास अतिशय धोक्याचा वाटत आहे. परंतु दोनदा बसच्या दाराशी येऊन वीज पडली, ती पाहता माझ्या मनात एक शंका येत आहे. ती अशी, की आपल्यापैकी कोणा एकाचा मृत्यू निश्चित आहे. त्याच्यामुळे सर्वांवर संकट ओढावत आहे. ज्याचा मृत्यू आहे, तो जर या बसमधून उतरला, तर उर्वरित सर्वांचे प्राण वाचू शकतील.

ड्रायव्हरच्या बोलण्याने सगळेच घाबरले. एकाने शंका उपस्थित केली, की नेमका कोणाचा मृत्यू आहे, हे कळणार कसे? 

ड्रायव्हर म्हणाला, 'माझ्यासकट सगळ्यांनी एक एक करून बसमधून खाली उतरावे आणि काही अंतरावर एक झाड आहे, त्या झाडाला हात लावून बसमध्ये परत याव़े' सर्वांनी त्याचे म्हणणे मान्य केले. बसमधले प्रवासी भितभितच उतरले आणि चिंब पावसात भिजत जाऊन एक एक करून झाडाला हात लावून आले. 

जवळपास सगळे प्रवासी झाले. अगदी ड्रायव्हर आणि कंडेक्टरसुद्धा! शेवटचा एक प्रवासी कोपऱ्यात बसला होता. सगळ्यांच्या माना त्याच्याकडे वळल्या. त्याला उतरणे भाग होते. ज्याअर्थी सगळे जण वाचले, त्याअर्थी आज आपला मृत्यू निश्चित! परंतु आपल्या जाण्याने बाकीच्यांचे प्राण वाचतील, या विचाराने तो शेवटचा प्रवासी दबक्या पावलांनी उतरत झाडाला स्पर्श करायला गेला. तेवढ्यात जोरात वीज कडाडली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले...

झाडाला स्पर्श करायला गेलेला प्रवासी एकटा उरला आणि बसवर वीज कोसळून सगळे प्रवासी जागीच बेचिराख झाले. याचाच अर्थ, त्या एका प्रवाशाच्या पुण्याईने इतका वेळ अन्य प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून रोखले होते. तो दूर जाताच, काळाने घात केला. 

या बोधकथेतून तात्पर्य हेच आहे, की आपले संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांचे दोष शोधण्यात संपवू नका. ज्यांना आपण आपला शत्रू समजतो, कधी कधी त्यांच्याच सदिच्छा आपल्या कामी येतात. म्हणून सर्वांशी नेहमी मित्रत्त्वाने वागा आणि दोष दूर करायचेच असतील, तर स्वत:मधले करा.

Web Title: The impulse to live given by death How so Read this parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.