अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. प्रगत विज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे दुष्परिणामही आहेत. नैसर्गिक, शारीरिक व्यायाम कमी झाला आणि निकृष्ट प्रतीचा व अभक्ष्य आहार वाढला. तसेच प्रदूषण, मानसिक ताण, भीती, अस्थिरता वाढून परिणामत: हृदयविकार फोफावू लागला आहे.
अमेरिकेत १०० पैकी ५४ मृत्यू हृदयविकाराचे असतात. तर भारतात मृत्यूला कारणीभूत होणऱ्या रोगांमध्ये सांसर्गिक व क्षय यानंतर हृदयविकाराचा तिसरा क्रमांक आहे. यात तरुणांचाही समावेश असणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यावर आबालवृद्ध, गरीब, श्रीमंत, स्त्री पुरुष कोणालाही करता येण्यासारखा सोपा उपाय म्हणजे सूर्योपासना!
सूर्यापासून माणसाचा जन्म असल्याने सूर्याचा व माणसाचा त्यातही सूर्याचा व हृदयाचा निकट संबंध असल्याने यावर सूर्योपासनेचा चांगला उपयोग होतो असा अनेकांचा अनुभव आहे. सूर्य हा जगताचा आत्मा आहे हे सर्व प्रसिद्ध आहे.
सूर्याचा व आपल्या हृदयाचा निकट संबंध आहे हे जाणून वेदापासून सर्व ऋषीमुनींनी सूर्योपासना श्रेष्ठ म्हणून सांगितली आहे. पूर्वी लहानपणापासून लोक नित्य सूर्यनमस्कार घालत असत. गायत्री उपासना करत असत. त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमी होते.
सद्यस्थितीत आपल्या सभोवतालचे वातावरण बदलणे आपल्याला शक्य नाही. परंतु आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊच शकतो. संकटांनी, आजारांनी दार ठोठावण्याआधी जागे होऊया आणि सूर्योपासनेला प्रारंभ करूया. सुदृढ होऊया. रोगप्रतिकारक्षमता वाढवूया आणि नैराश्य, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांना समूळ नष्ट करण्याचा चंग बांधुया!