सुंदर सारवलेले अंगण असेल, तर अंगण पूजेचा मोह तरी कसा आवरणार?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 29, 2021 09:00 AM2021-01-29T09:00:00+5:302021-01-29T09:00:02+5:30

अंगण हे भूमीचे प्रतीकात्मक रूपदर्शन आहे. अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरात. त्यांचे तेजस्वी प्रकाशकिरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे.

If there is a practiced courtyard, then how to cover the temptation of courtyard worship? | सुंदर सारवलेले अंगण असेल, तर अंगण पूजेचा मोह तरी कसा आवरणार?

सुंदर सारवलेले अंगण असेल, तर अंगण पूजेचा मोह तरी कसा आवरणार?

googlenewsNext

अंगणाला घराच्या अंतरंगाचे प्रतीक मानतात. अंगणावरून घराची कळा, घराचे रूप, घराचे सौंदर्य ओळखणे यासारखा वाकप्रचार अशा अर्थाचे द्योतक आहे. अंगणाविषयी असलेल्या अतीव आदरामुळे अंगणपूजेचा विधी हा हिंदू जीवनपद्धतीतील भावभक्तीचा अगाध महिमा आहे. गावाकडे आजही अंगण सारवले जाते, सुशोभित केले जाते. तो आनंद शहरात अनुभवणे कठीण आहे. म्हणून आजही शहरी माणूस मोकळ्या वेळेत गावातच जास्त रमतो.

घराच्या पुढच्या आणि मागच्या मोकळ्या जागेला अंगण म्हणतात. अंगण म्हणजे घराच्या परिसराचे मुक्त वातावरण होय. प्राचीनकाळी भव्य वाडे, राजवाडे इत्यादी वास्तू अनेक चौकांच्या असता. या चौकोनांनाही अंण असेच संबोधण्यात आले आहे. वाल्मिकी रामायण, हर्षचरित इ. ग्रंथांमध्ये अशी अंगणे उल्लेखली आहेत. अंगण हे भूमीचे प्रतीकात्मक रूपदर्शन आहे.

सूर्योदयापूर्वी झाडून त्यावर गोमयमिश्रित जलाने सडासंमार्जन करून रांगोळी घालून अंगणाचा परिसर व वातावरण प्रसन्न करणे, यालाच अंगणपूजा म्हणतात. शेणखळा, सडा याने माती बसते. घरात येत नाही. घरातील हवा शुद्ध राहते. शेण, गोमूत्र हे प्रदूषण निवारक आहेत. हे मान्य होऊ लागले आहे. अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरात. त्यांचे तेजस्वी प्रकाशकिरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे.

प्राचीन काळापासून घरापुढील अंगणाशी अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुबंधित आहेत. आपल्याकडे सण, उत्सव, व्रतवैकल्ये आणि धार्मिक विधिप्रसंगी अंगणात सडासंमार्जन करून त्यावर रांगोळी घालण्याची पूर्वापार पद्धत आहे. यशोदेला पूत्र झाला असता, गोकुळात झालेल्या जल्लोषाच्या आनंदोत्सवात या बाबीचा उल्लेख आहे. बहिरा जातवेदाने या प्रसंगाचे वर्णन करताना म्हटले आहे-

मग गौळी काय केले, समग्र वाडे झाडिले,
आणि संमार्जन केले, गृहद्वारी।
सडे घातले अंगणी, चौक घालिती सुहासिनी,
विचित्र ध्वजा तोरणी, माळा पुष्पाचिया।

अंगणात रंगमाळा रेखणे हा स्त्रियांच्या व्रतवैकल्यातला एक उपचार आहे. चैत्रांगण ही रांगोळी लौकक व्रताचाच एक कुळधर्म आहे. चातुर्मासात अंगणात स्त्रिया विविधरंगी रांगोळ्या काढण्याचे व्रत करतात. संस्कृतीतील अनेक वा काही खास प्रतीके या चैत्रांगण रांगोळीत रेखाटलेली असतात. संस्कृतीजतनाचा हा एक सुरेख शैक्षणिक उपक्रम होता.

लोकसाहित्यातील अंगणाचे वर्णन हे छोट्या देऊळवाड्याची आठवण करून देणारे आहे. त्याचे भावस्वरूप लोकगीतातून मार्मिकपणे मांडले आहे. 

माझ्या अंगणात पिवळ्या लाल ग कर्दळी,
बाळाची वर्दळी चारी दिशा।
माझ्या अंगणात लाविल्या तुळशी,
नाही होणार आळशी तान्हे बाळ।
माझ्या अंगणात तुळशीचा वाफा,
गोविंद घाली खेपा मंजुळींना,
माझ्या अंगणात शोभती दुर्वा फुले ,
खेळाया येती मुले बाळासंगे।

अंगण हे घराच्या प्रारंभाचे प्रवेशाच ठिकाण. तिथपासून पवित्र, स्वच्छ, मंगल, वातावरण निर्माण व्हावे, हा या अंगणपूजेचा हेतू. अंगण स्वच्छ, नीटनेटके करून नि रांगोळीने भवतालच्या झाडांनी सुशोभित करणे हेच पूजन! 

Web Title: If there is a practiced courtyard, then how to cover the temptation of courtyard worship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.