Deep Amavasya Puja Rules:चातुर्मासातील पहिली अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. आषाढ अमावास्या ही दीप अमावास्या म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दीप पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवा लावणे हा महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे या आषाढ दीप अमावास्येला अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. परंतु, दीप पूजन करताना अचानक दिवा विझला गेला तर नेमके काय करावे? दिवा विझणे अशुभ मानले जाते का? जाणून घेऊया...
दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. चातुर्मासातील पहिली दीप अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. दीप अमावास्या, श्रावण महिन्याची सुरुवात आणि गुरुपुष्यामृताचा अत्यंत शुभ मानला गेलेला योग यामुळे या दिवसांचे महत्त्व दुपटीने वाढल्याचे म्हटले जात आहे.
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
दिव्याला अमृतासमान महत्त्व
ऋग्वेदात दिव्याला अमृतासमान महत्त्व देण्यात आले आहे. देवरुप प्रकाशातून अंधकाराचा नाश करण्याची प्रेरणा आम्हाला मिळो, जीवन सुखी होवो, असे आवाहन अग्नी देवतेला करण्यात येते. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. पूजा झाल्यानंतरही देवाला धूप, दीप अर्पण केले जाते. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे.
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
कोणत्या दिशेला दिवा लावावा?
दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर, तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल, तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा, असे सांगितले जाते. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.
दीप पूजन करताना चुकून दिवा विझल्यावर काय करावे?
देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्ज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.