Guru Purnima 2022: गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपणारी आणि शिष्याला गुरुपदी नेण्याची तळमळ दर्शवणारी शास्त्रीय संगीत कला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:23 PM2022-07-13T14:23:28+5:302022-07-13T14:24:12+5:30

Guru Purnima 2022: शिष्याची शिकण्याची ओढ असेल तर गुरु शिकवण्यासाठी सदैव तत्पर असतात, याचेच उदाहरण दर्शवणारी संगीत परंपरा!

Guru Purnima 2022: Classical music art that preserves the heritage of Guru-Shishya tradition and shows the desire to take the disciple as Guru! | Guru Purnima 2022: गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपणारी आणि शिष्याला गुरुपदी नेण्याची तळमळ दर्शवणारी शास्त्रीय संगीत कला!

Guru Purnima 2022: गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपणारी आणि शिष्याला गुरुपदी नेण्याची तळमळ दर्शवणारी शास्त्रीय संगीत कला!

Next

>> माणिक शरदचन्द्र अभ्यंकर

गुरू-शिष्य परंपरा ही शास्त्रीय संगीताचा अविभाज्य घटक आहे. तो अविरत वाहता झरा आहे, आपली संस्कृती आहे. गुरू म्हणजे ओघवत्या ज्ञानाचा स्त्रोत. ज्ञानमार्गाची उपासना करून शाश्वत सत्याचे बोट धरून नेणारा गुरू संत पदाला जाऊन पोहोचतो. म्हणूनच, ज्ञानेश्वर माऊलींनी गुरूला ‘संतकुळीचा राजा’ असे संबोधले आहे. स्वतःमधील ज्ञान, विचार, कला, निपुणता तसेच आध्यात्मिक शक्ती गुरू आपल्या शिष्यामधे ओतत असतो. त्याच्यामधे दडलेल्या कलाकाराच्या जाणीवा जागृत करण्यासाठी तो सदैव कटिबद्ध असतो. गुरूमुळे शिष्य घडत असतो. ज्ञानाच्या महासागरातील ओंजळभर ज्ञानामृत जरी गुरूकडून घेता आलं तरी ते फार मोठं असतं. 

संगीत ही गुरूमुखी विद्या आहे. अध्यात्माकडे नेणारं ते एक सुरेल साधन आहे. गायन, वादन व नृत्याच्या सुरस्त्रोतातून होणारा तो स्वराभिषेक आहे. या आनंदसमाधीची अनुभूती एक सक्षम गुरूच देऊ शकतो. उत्तम गुरू नशिबात असावा लागतो आणि शिष्याची कष्ट करण्याची  तयारी असावी लागते. स्वकष्टाने मिळवलेल्या भाकरीची गोडी चाखण्यासाठी बी पेरून त्या बीजाचं संगोपन करावं लागतं. संगीत क्षेत्रात पदव्या मिळवण्याइतकी ही गानकला काही सोपी नसते. मुळात गाण्याचं शिक्षण कधी संपतच नाही; कारण या आकाशाच्या पल्याड दुसरं अक्षय, अनंत असं स्वर आकाश असतं. या स्वरावकाशात पोहोचण्यासाठी तंबोऱ्यातून अव्याहत झरणाऱ्या नादब्रह्माच्या आवर्तनांची आणि एका सक्षम गुरूची आवश्यकता असते. 

गुरूकडून तालीम घ्यायची म्हणजे सुरूवातीला कित्ता गिरवावाच लागतो. सुरांची स्थिरता, आवाजातील भरीवपणा, स्वरमाधुर्य यांसाठी गळ्यावर मेहनत घेणं गरजेचं असतं. आकारात शुद्धता व तानेतील तरलता येण्यासाठी पलट्यांचा, अलंकाराचा रियाज करावा लागतो. कालांतराने राग गळ्यावर चढण्यासाठी त्या रागातील अनेक बंदिशी गुरूसमोर बसून जप माळेप्रमाणे सतत घोटाव्या लागतात. या बंदिशींमधून रागाचं चलन समजतं व राग स्वरूप आकारास येऊ लागतं. 

ही तालीम गुरूसमवेत घेत असतांना मनाची चलबिचल अवस्था हळूहळू स्थिरावते व मन एकाग्र होऊ  लागतं. या एकतानतेतून हळूहळू ‘मी’ पणाचे सारे अहंकार गळू लागतात. स्वर-कोशात अडकलेलं मन मग स्वरांपलिकडल्या अमूर्त जगात जाऊन पोहोचतं आणि ‘गुरू वैराग्याचे मूळ’ या ज्ञानदेवांना उमजलेल्या ज्ञानाची अलवार उकल होत जाते. मुळात शिष्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीतून तावूनसुलाखून काढणारी शिक्षणपद्धती गुरूच्या ठायी असते. चांगला शिष्य होण्यासाठी त्याला शक्याशक्यतेचा उंबरठा ओलांडावा लागतो. 

कला कुठलीही असू दे, ती सादर करण्यासाठी लागणारे परिश्रम थोड्या बहुत फरकाने सारखेच असतात. कलाकार होण्यापूर्वी एक चांगला शिष्य होणं खूप महत्वाचं असतं आणि चांगला शिष्य तोच होऊ शकतो ज्याला रियाजाची, साधनेची भूक लागते. गुरूकडून मिळालेल्या तालीमीचा डोळस रियाज केला तरच शिष्याची सर्जनशील प्रतिभा पूर्ण विकसित होऊ शकते आणि बीजाचा डेरेदार वृक्ष तयार होऊ शकतो. 

बुद्धाने अनेक जणांकडून ज्ञान मिळवलं परंतु अंतिम सत्य मात्र त्याला त्याच्याच ध्यानधारणेतून मिळालं. गुरूच्या मार्गदर्शनाने व स्वनिष्ठेने केलेला रियाज शिष्याला नवसृजनाच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो…’आपुलाची संवाद आपणाशी’ या माऊलींच्या उक्तीप्रमाणे कालांतराने तो रियाजच त्याचा गुरू होऊ लागतो…रियाजाने स्वर-विश्वाशी तद्रुप होता येतं. ही प्रक्रिया गुरूशिवाय कशी घडणार? 

गुरूचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही; पण ते पांघरून घेतले, तर “देव माझा,मी देवाचा” या अवस्थेला नक्कीच पोहोचता येतं…

Web Title: Guru Purnima 2022: Classical music art that preserves the heritage of Guru-Shishya tradition and shows the desire to take the disciple as Guru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.