Ganesh Chaturthi 2025 Rules: प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती गणपती हा अबालवृद्धांचे लाडके दैवत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होतो. यंदा २०२५ मध्ये बुधवार, २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी लाखो घरांमध्ये पार्थिव गणपती पूजन केले जाते. हजारो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा अविरत, अखंडितपणे सुरू आहे. उत्तरोत्तर त्याचे स्वरुप व्यापक होत जाताना पाहायला मिळत आहे. परंतु, गणपतीत काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. श्री गणेश चतुर्थी व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते, असे म्हणतात. २७ ऑगस्ट २०२५ पासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. गणपती आगमन आणि गौरी पूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात.
गणेश पूजनाला तब्बल साडेतीन हजार वर्षांची परंपरा
सुमारे ३.५ हजार वर्षांपूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे. प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.
गणेशोत्सवात कोणते नियम आवश्यक मानले जातात?
- श्रीगणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या ८ ते १० दिवस आधी घरी आणून ठेवता येते. ती आदल्या दिवशीच घरी आणावी असे नाही, तसेच मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते.
- भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करणेसाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रातःकालापासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. १:३० पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना व पूजन करता येते.
- पूजनाची गणेशमूर्ती मातीचीच हवी.
- आपण स्वत: पुस्तकावरून गणेश पूजन करू शकतो.
- अगरबत्ती, धूप, कापूर केमिकल फ्री असावेत.
- उजव्या सोडेंचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोडेंचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे.
- भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना/पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये.
- गणपती स्थापना झाल्यावर सुवेर किंवा सुतक आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालू शकतात.
- घरामध्ये गर्भवती श्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे.
- प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यांतून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.
गौरीपूजन आणि काही महत्त्वाच्या गोष्टी
- गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. तिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात.
- भाद्रपदातील गौरी काहीजणांकडे उभ्या असतात, तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे.
- घरातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाचे आत (नेहमीप्रमाणे) कुलाचाराप्रमाणे गौरी पूजन करावे. काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर, सुगडावर बसविण्यास सांगितले जाते, यास कोणताही आधार नाही. केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते. अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमीप्रमाणे करावे.
- भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करता येते.
- अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ता दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो.
- असे असले तरी प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे, आपापल्या कुळाचार, कुळधर्माप्रमाणे गणपती आगमन, पूजन, गौरी आवाहन, पूजन करावे, असे सांगितले जात आहे.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥