Ganesh Chaturthi 2025 : १४ विद्या, ६४ कलांचा अधिपती, महादेव-पार्वतीचा पुत्र प्रथमेश गणपती याच्या केवळ स्मारणाने मन आनंदी होते, चैतन्य निर्माण होते. वातावरण एकदम सकारात्मक होते. अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. हजारो घरांमध्ये आणि मंडळांमध्ये गणपतीचे डेकोरेशन अगदी शेवटच्या टप्प्यात आले आहे. घरोघरी गणपती आगमनाच्या तयारीची लगबग वाढली असून, पूजेसाठी लागणारे साहित्याची जमवाजमव सुरू झालेली आहे. गणपतीसाठी केला जाणारा नैवेद्य याचे बेत ठरत आहेत.
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
प्रगत तंत्रज्ञानाच्या जगात सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. अगदी युट्यूबपासून ते इन्स्टाग्रामपर्यंत माहितीचा प्रचंड भरणा होत आहे. दुसरीकडे, गणपती पूजनासाठी गुरुजी मिळत नाहीत, मिळाले तरी वेळा जमत नाहीत, या आणि अशा अनेक कारणांमुळे रेकॉर्डेड गणपती पूजन करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचे पाहायला मिळते. यातच आता फेसबुक लाइव्हचा पर्याय स्वीकारूनही अनेक पुरोहित यजमानांना लिंक पाठवून आभासी पूजन करत असल्याचे दिसत आहे. दोन्ही गोष्टी नसतील, तरी युट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहून पार्थिव गणपती पूजन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, आभासी जगताचा आधार घेत किंवा रेकॉर्डेड पद्धतीने केलेले पार्थिव गणपती पूजन सफल होते का, वर्षातून एकदा घरी येणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनाचे पुण्य मिळते का, असे काही प्रश्न उपस्थित केले जात असून, यावर चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
केवळ श्रवणाचे समाधान मिळू शकते
पूजा–आरती ही फक्त मंत्रोच्चार किंवा गीत प्रकार नसून, ती भावना आणि देवतेशी एकरूप होण्यासाठी केलेली प्रार्थना असते. म्हणून Alexa, Siri किंवा YouTube वरून केलेले पूजन किंवा या माध्यमातून लावलेली आरती हा केवळ एक कृत्रिम आवाज असतो. यामध्ये प्रत्यक्ष गुरुजींनी येऊन म्हटलेल्या मंत्रांचा अभाव असतो. पुरोहितांनी म्हटलेल्या मंत्रांना अनन्य साधारण महत्त्व असते. त्यातून इच्छा फलिभूत होणार असते. संकल्प सिद्धीस जाण्यास मदत होणार असते. भक्तिभाव असतो. आवाजातील चढ-उतार, यजमानाने प्रत्यक्ष ऐकून, कृती करून त्याचा एक भाव वातावरणातही तयार होत असतो. घरातील वातावरण सकारात्मक होण्यासाठी, नकारात्मकता जाण्यासाठी खड्या आवाजातील मंत्रोच्चर अतिशय प्रभावी मानले जातात. गणपतीशी आपोआप एकरूप होता येते. आपली एकादी कृती राहिली, तर प्रत्यक्ष गुरुजी असले की ती पुन्हा सांगू शकतात. रेकॉर्डेड पूजेत पुढे-पाठी करण्यासाठी सोय असली तरी तात्पुरते का होईना आपले लक्ष विचलित होते. पूजेचा नैसर्गिक भाव खंडित होतो. रेकॉर्डेड पूजेत मानसिक सहभाग तयार होईलच असे नाही. यातून केवळ श्रवणाचे समाधान मिळू शकते, असे म्हटले जाते.
रेकॉर्डेड गणपती पूजनाचे पुण्य मिळते का?
जेव्हा आपण स्वतः मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या श्वासातून कंपन निर्माण होतात. हे कंपन घरातील वातावरण, पूजा साहित्य, पाणी, धूप, दिवा यावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. मशीनमधून आलेला आवाज असा स्पंदन शक्ती निर्माण करत नाही. पूजा/आरती केल्यावर देवाची कृपा व्हावी, अशी नकळत का होईना इच्छा व्यक्त केलेली असते. किंवा प्रत्यक्ष संकल्प करून तसा मानस बोलून दाखवलेला असते. प्रत्यक्ष मंत्रोच्चारासह केलेल्या पूजनाच्या वातावरणात निष्ठा आणि श्रद्धा अधिक प्रभावीपणे देवाचरणी समर्पित होऊ शकते. Alexa/YouTube वर रेकॉर्डेट कंटेट कृत्रिम असतो. अशा वेळेस आपल्या मनात अनेक विचार येऊन पूजेतील लक्ष विचलित होऊ शकते. प्रत्यक्षपणे मंत्रोच्चार करून पूजा करताना, मंत्रांकडे, कृतीकडे, आता पुढे काय करायचे, आपले काही चुकत तर नाही ना, गुरुजींनी सांगितलेले नीट समजत आहे ना, अशा अनेक गोष्टींमुळे पूजेकडे जास्त लक्ष राहते. वेद-मंत्रांचे उच्चारण जिवंत वाणीने झाले की त्याला श्रुतीशक्ती मिळते. त्यामुळे अशा प्रकारे रेकॉर्डेड गणपती पूजनाने पुण्य प्राप्त होईलच असे नाही.
दरम्यान, देव कितीही भक्ताचा भाव पाहत असला, समर्पण, निष्ठा, श्रद्धा पाहत असला, तरी देवतेशी एकरूप होण्यासाठी मोठ्याने उच्चारलेले मंत्र अतिशय प्रभावी भूमिका बजावत असतात. प्रत्यक्ष मंत्रोच्चाराचा आपल्या शरीरावर, मनावर, घरातील वातावरणावर मोठा प्रभाव पडत असतो. कलियुगात नामस्मरणाला महत्त्व देण्यात आले आहे. मंत्रांचे जप करण्याचा अनेक सल्ला दिला जातो. कारण केवळ त्या मंत्रात ताकद आहे असे नाही, तर त्याच्या स्पष्ट उच्चारानेही मोठा परिणाम होत असतो, असे सांगितले जाते.