Diwali 2020 : दिवाळीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 05:06 PM2020-11-02T17:06:24+5:302020-11-02T17:13:58+5:30

Diwali 2020: सणांची महाराणी दिवाळी, सर्वार्थाने महत्त्वाची आहे. या निमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया आणि सणाचा आनंद द्विगुणीत करूया.

Diwali 2020: Historical and mythological significance of Diwali | Diwali 2020 : दिवाळीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया

Diwali 2020 : दिवाळीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया

googlenewsNext

दिवाळी हा जेमतेम पाच दिवसांचा सण असला, तरी महिनाभर आधीपासून आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. मात्र, दिवाळी सुरू झाली, की भरभर दिवस निघुन जातात. तरीदेखील या पाच दिवसात कमावलेला आनंद आपल्याला वर्षभर पुरतो. 

कार्तिक महिन्यातील त्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला मुख्य दिवाळी असते. तो दिवस लक्ष्मीपूजेचा असतो. वसुबारस ते भाऊबीज असा दिवाळीचा जल्लोष केला जातो. या सणांच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया आणि सणाचा आनंद द्विगुणीत करूया.

हेही वाचा : Diwali 2020: लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...शंभर वर्षांपूर्वी दिवाळी कशी होती पहा

बलिप्रतिपदेच्या दिवशी भगवान विष्णुंनी बळी राजाला पाताळ लोकाचे स्वामीत्त्व बहाल केले होते. त्यामुळे देवेन्द्राची काळजी मिटली आणि स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोकावर दिवाळी साजरी करण्यात आली. 

दिवाळीच्या दरम्यान समुद्रमंथन सुरू असता, लक्ष्मी पाठोपाठ धन्वंतरी आणि कालिका माता प्रगट झाली होती, म्हणून बंगालमध्ये दिवाळीत कालिका मातेची पूजा करतात.

प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणासकट अन्य दुष्टांचा नायनाट करून परत आले, म्हणून समस्त अयोध्यावासियांनी थाटामाटात दिवाळी साजरी केली होती. 

भगवान श्रीकृष्णांनी नरकासूराचा वध केला, त्या आनंदात गोकुळात दीपोत्सव साजरा केला होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही दिव्यांची आरास केली जाते.

गौतम बुद्धांच्या अनुयायांनी २५०० वर्षांपूर्वी त्यांच्या स्वागतासाठी लक्ष लक्ष दिवे लावून रोषणाई केली होती.

सम्राट विक्रमादित्याचा दिवाळीच्या मुहूर्तावर राजतिलक झाला होता.

इ.स. १५७७ मध्ये अमृतसरमधील स्वर्णमंदिराचा शिलान्यास केला होता.

दिवाळीच्या दिवसातच शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंह यांना कारागृहातून मुक्त केले होते.

दिवाळीतील पाडव्याला नेपाळमधील बांधवाचे तसेच गुजराती लोकांचे नववर्ष सुरू होते.

भगवान महावीर स्वामींचे निर्वाण याचकालावधीत झाले होते.  जैन मंदिरांमध्ये हा दिवस निर्वाण दिवस म्हणून पाळला जातो.

गुप्तवंशीय राजा चंद्रगुप्त विक्रमादित्यने 'विक्रम संवत' स्थापन केले. धर्म, गणित, ज्योतिष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विक्रम संवत्सराचा मुहूर्त काढला होता.

याव्यतिरिक्त यमद्वितीयेला अर्थात भाऊबीजेला आपल्या भावाल अकाली मृत्यू येऊ नये, म्हणून बहीण भावाला ओवाळते, दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि त्याच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी यमराजाला दीपदान करते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पूजेची सुरुवात करून मनुष्याला निसर्गाशी जोडले. 

अशी ही सणांची महाराणी दिवाळी, सर्वार्थाने महत्त्वाची आहे.

हेही वाचा : 'प्रत्येक 'क्षण' हा 'सण' झाला पाहिजे!' सद्गुरुंचे विचार पोहोचवत आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै!

Web Title: Diwali 2020: Historical and mythological significance of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी