देवांचे इंद्रपद बळीराजापासून पुन्हा मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला. वामनाचा जन्म भाद्रपद शुक्ल द्वादशीला श्रवण नक्षत्रावर झाला, असे भागवत पुराणात नमूद केले आहे. पूर्वीच्या काळी वामन जयंतीचे व्रत लोक करत असत. मात्र अलिकडे या व्रताबद्दल फार कमी जणांना माहिती असते. आपणही ज्ञानात भर म्हणून हे व्रत कसे असते, त्याचा विधी काय असतो ते जाणून घेऊ आणि सद्यस्थितीशी त्याची सांगड कशी घालता येईल, ते पाहू.
वामनाचा जन्म माध्यान्ही झाला. म्हणून वामनाच्या पूजेचा संकल्प माध्यान्ह उलटून गेल्यानंतर केला जातो. नद्यांच्या संगमावर स्नान करून नंतर एक घट पाणी भरून घरी आणाावा. सुयोग्य जागी त्या घटाची स्थापना करावी. घटामध्ये पंचरत्ने घालावी. घटावर आपल्या शक्तीनुसार जे पूर्णपात्र उपलब्ध असेल त्यामध्ये तीळ, गहू, जव यापैकी एक धान्य भरून त्यावर कोऱ्या वस्त्राच्या घडीवर वामनाची प्रतिमा स्थापन करावी. प्रतिमेच्या पुढे वामनप्रित्यर्थ म्हणून दंड, कमंडलू, छत्र, पादुका आणि अक्षमाला ठेवावी. नंतर विधिवत षोडशोपचारी पूजा करावी. वामनाचे ध्यान करावे. रात्री जागरण करावे. सकाळी उत्तरपूजा करून देवाचे विसर्जन करावे. त्यामधील वामनाची प्रतिमा, वस्त्र, दक्षिणेसह पुरोहितांना दान द्यावे. तसेच अतिथीला भोजन, वस्त्र, उपयुक्त वस्तुचे दान करावे.