Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan: गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. दत्त जयंतीला दत्तप्रभू आणि दत्तावतारांचे विशेष पूजन, नामस्मरण केले जाते. अनेक ठिकाणी गुरुचरित्र वाचले जाते. गुरुचरित्र ग्रंथ पारायण शक्य नसेल, तर स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्र सारामृताचे पारायण केले जाऊ शकते, असे सांगितले जाते.
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
यंदा, गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. गुरुवार हा दिवस दत्तगुरू, सद्गुरू आणि दत्तावरांना समर्पित असल्याचे मानले जात असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे म्हटले जात आहे. भक्तिभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक अशा या महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशिर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत एक अद्भूत दिव्य ग्रंथ ॥ Shree Swami Samarth Charitra Saramrut ॥
स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून, भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात. दत्त जयंती २०२५ च्या निमित्ताने पारायण करायची इच्छा असेल, तर सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार संकल्प बद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? ॥ How To Do Shree Swami Samarth Charitra Saramrut On Datta Jayanti 2025 ॥
स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले जाते. असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची ३, ७, ११ आणि २१ अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. त्यामुळे या दिवशी सांगता होईल, अशा पद्धतीने सप्ताह पारायणास सुरुवात करावी. शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ पासून सप्ताह पारायणास सुरुवात केली, तर गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी सप्ताह पारायणाची सांगता होऊ शकेल.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाची तयारी कशी करावी? ॥ Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan Preparation ॥
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण कुणीही करू शकते. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण संकल्प ॥ Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan Sankalp ॥
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी, सकाळीच, स्नानादि कार्ये झाल्यावर नित्याची देवपूजा करून, भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी.
पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे ॥ Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan Rules ॥
श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण केल्याने काय होते? ॥ Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan Falshruti ॥
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण केल्यास मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : Datta Jayanti 2025 provides an opportunity for Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan. Learn the rules, preparation, and benefits for a fulfilling spiritual experience, starting November 28th for completion on Datta Jayanti.
Web Summary : दत्त जयंती २०२५ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत परायण का अवसर प्रदान करती है। आध्यात्मिक अनुभव के लिए नियम, तैयारी और लाभ जानें, 28 नवंबर से शुरू होकर दत्त जयंती पर पूरा करें।