Pitru Paksha 2025 Chaturdashi Shradh Vidhi: अवघ्या काही तासांनी आता पितृपक्षाची सांगता होत आहे. रविवारी सर्वपित्री अमावास्या आहे. यंदाच्या वर्षी सर्वपित्री अमावास्येला खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने झाली होती. चंद्रग्रहण भारतातून दिसले होते, परंतु, सर्वपित्री अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. तत्पूर्वी, शनिवारी, २० सप्टेंबर २०२५ रोजी पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्ध आहे. चतुर्दशी श्राद्ध विशेष मानले जाते. जाणून घेऊया...
पितृपक्ष पंधरवड्यात अनेक तिथींना महत्त्व आहे. मात्र, चतुर्दशी तिथी एका वेगळ्या कारणासाठी विशेष आणि महत्त्वाची ठरते. चतुर्दशी तिथीला केवळ अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावा, असे शास्त्र सांगते. महाभारतातील अनुशासन पर्व आणि कूर्म पुराण या ग्रथांमध्ये याबाबत उल्लेख आल्याचे सांगितले जाते.
भाद्रपद वद्य चतुर्दशीला केवळ आणि केवळ शस्त्राने, सर्पदंश, आत्महत्या, अपघाती मृत्यू, विषबाधा यांसारख्या अकाली मृत्यू म्हणजचे अनैसर्गिकरित्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करावेत, असे शास्त्र सांगते. गया, बद्रीनाथ यांसारख्या ठिकाणी अकाली मृत्यू आलेल्या व्यक्तींच्या नावाने केलेले श्राद्ध कार्य शुभलाभदायक आणि पुण्याचे ठरते, असे सांगितले जाते.
एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अकाली किंवा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या नावाने विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत. एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे अनैसर्गिकरित्या निधन कोणत्याही तिथीला झाले असले, तरी त्यांच्या नावाने करावयाचे श्राद्ध कार्य हे केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे, असे शास्त्र सांगते.
अन्य सामान्यपणे निधन झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध कार्य हे त्या त्या तिथीला करावयाचे असते. मात्र, अनैसर्गिकरित्या मृत्यू आलेल्या व्यक्तींचे श्राद्ध करण्यासाठी चतुर्दशीचा दिवस राखून ठेवण्यात आले आहे. अकाली मृत्यू आल्यामुळे अशा व्यक्तींच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. अशा पूर्वजांचा आत्मा पितृलोकांत जात नाही, असे मानले जाते. अशा पूर्वजांच्या आत्म्याला गती मिळावी, यासाठी विशेष श्राद्ध तर्पण विधी करावेत. याशिवाय वस्तूंचे दानही यथायोग्य, यथाशक्ती करावे, असे सांगितले जाते.
कुटुंबातील ज्या व्यक्तींचे निधन चतुर्दशी तिथीला झाले आहे, त्यांच्या नावाने सर्वपित्री अमावास्या तिथीला श्राद्ध कार्य करावे, असे सांगितले जाते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन शुद्ध किंवा वद्य चतुर्दशी तिथीला नैसर्गिकरित्या म्हणजे सामान्यपणे झाले असेल, तर अशा पूर्वजांचे श्राद्ध कार्य चतुर्दशी तिथीला न करता सर्वपित्री अमावास्येला करावे, असे शास्त्र सांगते.