Chaitra Shree Lakshmi Panchami 2025: ३० मार्च २०२५ पासून हिंदू नववर्ष सुरू झाले. या वर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्रात दैवीच्या विविध स्वरुपांचे अगदी मनोभावे पूजन केले जाते. चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. ०२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र नवरात्रातील पंचमी तिथी असून, चैत्र शुद्ध पंचमी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते. धन, धान्य, वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे या तिथीला विशेष पूजन केले जाते. श्री लक्ष्मी पंचमी या दिवशी लक्ष्मी देवशी संबंधित श्लोक, स्तोत्रे, मंत्रांचे जप आवर्जून केले जातात. लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी, असे सगळ्यांनाच वाटत असते.
घरात सुख-समृद्धी, संपन्नता लाभावी, यासाठी माणूस सतत प्रयत्नशील, कार्यरत, मेहनत, परिश्रम घेत असतो. परंतु, अनेकदा समस्या संपतच नाहीत, अडचणी सुरूच आहेत, अशी भावना मनात निर्माण होते. अशा वेळेस अनेक उपाय केले जातात. लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयशय आहे, तिथे ती घटीकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली की, व्यक्ती रसातळाला जाते, असे म्हटले जाते. अशा वेळेस लक्ष्मी देवीशी संबंधित काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. पण, लक्ष्मी देवीशी संबंधित उपाय करताना मनापासून आणि नियम पाळूनच करावेत, असे म्हटले जाते.
सकाळी पहिली जाग आल्यावर लक्ष्मी देवीचे स्मरण करावे
दिवसाची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे. सकाळी पहिली जाग आल्यावर एक श्लोक अवश्य म्हणावा.
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।
हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे. उपरोक्त श्लोक नीट समजून घेतला, तर आपल्या लक्षात येईल, की लक्ष्मी, विद्या किंवा गोविंद प्राप्त करणे, ही मानवाच्या हातातली, म्हणजेच आवाक्यातली गोष्ट आहे. म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे जरूरी आहे. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा, चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली, की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे आहे.
समुद्रवसने देवी पर्वतस्थानमंडले । विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
हा श्लोकही आवर्जून म्हणावा. मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. परंतु, लक्ष्मीप्राप्तीचे सूत्र आपल्याच हाती आहे, हे त्याला उमगत नाही. तसेच आपापले कुळाचार, कुळधर्म, रिती-परंपरा यांनुसार सकाळी लक्ष्मी देवीचे पूजन करावे. जेव्हा-जेव्हा शक्य असेल, तेव्हा-तेव्हा लक्ष्मी देवीच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. श्लोक, स्तोत्रे म्हणावीत, लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. सकाळी लक्ष्मी देवीची सेवा केल्यावर सायंकाळी, तिन्हीसांजेला दिवेलागणीच्या वेळेसही लक्ष्मी देवीशी संबंधित काही उपाय करणे अतिशय शुभ मानले जाते.
लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे
तिन्हीसांजेचा काळ दिवेलागणीची वेळ महत्त्वाची मानली जातो. यावेळी लक्ष्मी घरात येते, अशी लोकमान्यता आहे. सूर्यास्तावेळी दिवलागणीला लक्ष्मी देवीची उपासना, नामस्मरण, पूजन विशेष लाभदायक तसेच पुण्यफलदायी मानले जाते. तिन्हीसांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा. यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, तिचे शुभाशीर्वाद मिळू शकतात. तसेच घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ शकते, असे सांगितले जाते.
लक्ष्मी देवीचे घरात शुभागमन होऊ शकते
काही मान्यतांनुसार, सूर्यास्ताची वेळ किंवा तिन्हीसांजेची वेळ, दिवेलागणीचा कालावधी लक्ष्मी देवीशी संबंधित असतो. या कालावधीत जर लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण केले, तर लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी काही कामे करणे शुभ मानले गेले आहे. ही कामे केल्याने लक्ष्मी देवीचे घरात शुभागमन होऊ शकते. देवीची कृपा लाभू शकते, असे सांगितले जाते.
- दीपप्रज्ज्वलन: सूर्यास्तावेळी तिन्हीसांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा अवश्य लावावा. यावेळी लक्ष्मी देवीचे मनापासून स्मरण करावे. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन, तिचे शुभाशीर्वाद मिळू शकतात. तसेच घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ शकते, असे सांगितले जाते.
- मौन धारण करणे: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये मौनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ऋषी-मुनी अधिकाधिक मौन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सूर्यास्तावेळी दिवेलागणीला मौन धारण करावे, असे सांगितले जाते. या कालावधीत आपल्या आराध्याचे नामस्मरण, मंत्रजप, जपजाप मौन धारण करून करावा, असे म्हटले जाते. असे केल्याने आपण जे पूजन, आराध्याचे स्मरण करतो, त्याचे पुण्यफल, शुभफल प्राप्त होऊ शकते. तसेच गृहक्लेश कमी होऊ शकतो, अशी मान्यता आहे.
- पूर्वजांचे स्मरण: सूर्यास्तावेळी दिवेलागणीला पूर्वजांचे स्मरण अवश्य करावे, असे म्हटले जाते. घरात जर पूर्वजांचा फोटो लावला असेल, तर तिथे जाऊन मनापासून नमस्कार करावा, पूर्वजांचे स्मरण करावे. चांगल्या आठवणींना मनात उजाळा द्यावा, एक दिवा लावून पूर्वजांना अर्पण करावा. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन त्यांची कृपादृष्टी लाभू शकते, असे सांगितले जाते.
- झोपू नये: तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी झोपू नये, असे सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कृतीतून, आचरणातून, कर्मातून वृद्धीला जात असते. जर या कालावधीत झोपले तर त्या व्यक्तीचे भाग्यही झोपते, भाग्याचे पाठबळ राहत नाही, नशिबाची साथ सुटू शकते, असे सांगितले जाते. जर एखादी व्यक्ती आजारी असेल, परंतु थोडावेळ उठून बसणे शक्य असेल, तर या कालावधीत नुसते बसून आणि शक्य असेल तर आराध्याचे मनातल्या मनात स्मरण करावे, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.