शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:42 IST

१२ मे रोजी आहे वैशाख शुद्ध पंचमी आणि त्याच दिवशी आहे अद्वैतज्ञानभास्कर भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांची जयंती!

>> रोहन विजय उपळेकर

"जगद्गुरु भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराज" असे नुसते नाव जरी उच्चारले तरी आम्हां भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि दोन्ही हात जोडले जाऊन केव्हा मस्तक नमवले जाते, ते कळत देखील नाही. इतका या श्रेष्ठ, प्रत्यक्ष शिवावतारी व अलौकिक, अद्भुत विभूतिमत्वाचा आम्हां भारतीयांच्यावर प्रेमळ पगडा आहे. त्यांचीच प्रात:स्मरण स्तोत्रे म्हणत-ऐकत आमचा दिवस उजाडतो तर त्यांची अपराधक्षमापन स्तोत्रे म्हणत रात्री आम्ही भारतीय लोक झोपी जातो. आमच्या दैनंदिन जीवनात श्रीमद् शंकराचार्यांचा असा 'अक्षर सहवास' आम्हांला सतत लाभतो व त्यातील अद्भुत माधुर्य, गेयता, रसिकता व ज्ञानप्रकर्षामुळे तो हवाहवासाही वाटतो.

भारतीय तत्त्वपरंपरेत सर्वात श्रेष्ठ व मानाचे स्थान भूषविणा-या अद्वैत-वेदान्त दर्शनाचे प्रणेते भगवान भाष्यकार श्रीमद् शंकराचार्य हे आमचे परमपूजनीय, प्रात:स्मरणीय मार्गदर्शक आहेत. श्री आचार्यांच्या भव्य जीवन-कार्याचे एका श्लोकात वर्णन करताना म्हणतात,

अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित् ।षोडशे कृतवान्भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात ॥

केरळ प्रांतातील कालडी गावी शिवगुरु-आर्यांबा या सात्त्विक दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या या परिपूर्ण शिवावताराने वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांचा संपूर्ण  व सांगोपांग अभ्यास केलेला होता. त्यांना बाराव्या वर्षी यच्चयावत् सर्व शास्त्रे मुखोद्गत झालेली होती. नर्मदा किनारी सद्गुरु श्री गोविंदयतींकडून कृपाप्रसाद प्राप्तीनंतर, प्रमुख दश उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, विष्णुसहस्रनाम आदी ग्रंथांवरील सर्व भाष्ये त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहून पूर्ण केली. पुढील सोळा वर्षे संपूर्ण भारतखंडामध्ये अद्वैत वेदान्ताचा प्रचार प्रसार करून हा दिग्विजयी अवतारी महात्मा केवळ बत्तिसाव्या वर्षी मर्त्य जगाचा निरोप घेऊन निजधामी परतला. अर्थात् त्यांचे लौकिक रूप अदृश्य झाले असले तरी, आपल्या ग्रंथांच्या दिव्यरूपाने ते सदैव सर्वांच्या पाठीशी आहेतच.

श्री आचार्यांचे हे जीवनकार्य नुसते वाचतानाही आपल्या मनात धडकी भरते. त्यांचे एकेक ग्रंथ सुद्धा एका मानवी आयुष्यात पूर्ण समजून घेता येणार नाहीत इतके अद्भुत आहेत. श्री शंकराचार्य व श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या जीवन व कार्यात खूप साम्य आहे व हे दोघेही आपल्याकडचे अद्वितीय चमत्कारच आहेत !श्रीमद् आचार्यांच्या भाष्यांपेक्षाही त्यांचे खरे स्वरूप त्यांच्या, "प्रबोधसुधाकर, शतश्लोकी, अपरोक्षानुभूती, ब्रह्मज्ञानावलीमाला" इत्यादी प्रकरणग्रंथ तसेच त्यांच्या रसाळ, मोहक स्तोत्रांच्या अभ्यासानेच कळते. श्री आचार्य हे फार रस-भावपूर्ण अंत:करणाचे भक्तश्रेष्ठ होते. त्यांच्या स्तोत्रांमधील भक्तश्रेष्ठाच्या भाव-विश्वाचे मनोज्ञ प्रेमदर्शन आपल्याला अंतर्बाह्य स्तिमित करणारे, खळाळत्या असीम भक्तिगंगेत अंतर्बाह्य ओलेचिंब भिजवणारे आहे. "मूकास्वादनवत् ।" अशी सर्वांग-तृप्ती प्रदान करणारे आहे !!

सनातन वैदिक धर्माचे त्यांनी केलेले संरक्षण व पुनरुज्जीवन कार्य हे वादातीत अलौकिक आहे. श्री आचार्य झाले नसते तर संपूर्ण भारतीय उपखंड हा वेदविरोधी व अपूर्ण अशा नास्तिक संप्रदायांनी गिळंकृत केला असता. श्री आचार्यांच्या थोर कार्यामुळेच अजरामर व सर्वश्रेष्ठ अशी आपली वैदिक संस्कृती आपण आजही अभिमानाने जोपासू शकलेलो आहोत. हे त्यांचे आपल्यावरचे कृपाऋण विसरून चालणार नाही. आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांच्या शेकडो पिढ्या व पुढे होणा-या वंशजांच्याही शेकडो पिढ्यांपर्यंत हे आचार्य-ऋण आपण मस्तकावर सादर, सप्रेम वागविणार आहोत, नव्हे ते आपले आद्य कर्तव्यच होय!

श्रीमद् आचार्यांचा आणखी एक खूप मोठा उपकार म्हणजे, त्यांनी त्या काळात प्रामुख्याने प्रचलित असलेल्या, गणपती, शंकर, विष्णू, देवी व सूर्य या पाच ब्रह्मस्वरूप देवतांच्या सर्व उपासना संप्रदायांचा "पंचायतन पूजा" या एकाच प्रकारात केलेला विलक्षण समन्वय, हा होय. आचार्यांच्या या सुरेख समन्वयामुळेच विविध संप्रदाय आपापले हेवे-दावे सोडून एकत्र आले व भारतीय संस्कृती शकले होण्यापासून वाचली.

सनातन वैदिक हिंदू धर्माच्या रक्षण व संवर्धनासाठी त्यांनी भारताच्या चार दिशांना जगन्नाथपुरी, शृंगेरी, द्वारका व बद्रिनाथ अशी चार व कांचीला पाचवे पीठ स्थापन केले. आपल्या प्रमुख शिष्यांची त्यावर स्थापना करून त्यांना कार्य-नियमावली व उपासना घालून दिली. सनातन धर्माच्या संधारणेसाठी प्रचंड ग्रंथरचना करून भक्कम तात्त्विक आधार निर्माण करून ठेवला. विविध स्थानांवर देवतांची प्रतिष्ठापना करून लोकांना उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले. कन्याकुमारीपासून ते पार अफगाणिस्तानापर्यंत आणि पश्चिम सागरापासून ते पूर्वेच्या कामाख्येपर्यंत अखंड भ्रमण करून त्यांनी धर्मस्थापना केली. त्याच काळात त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील भूवैकुंठ पंढरीत येऊन भगवान श्रीपांडुरंगांचे दर्शनही घेतले. ते सावळे सुकुमार राजस रूप पाहून, उत्स्फूर्त अष्टक रचून या मदनमोहनाची स्तुती करायचा मोह आचार्यांच्या रसिकाग्रणी भक्तहृदयाला आवरला नाही. अवघ्या बत्तीस वर्षात एवढे प्रचंड व अमानवी कार्य केवळ श्रीभगवंतच करू शकतात, यात किंचितही शंका नाही. म्हणूनच आमचे सर्व मायबाप साधूसंत श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांना प्रत्यक्ष अपरशिवच जाणून भजतात.

श्रीमद् भगवत्पादाचार्यांचे विभूतिमत्त्व कसे आहे माहितीये? बहरलेल्या डेरेदार महान वटवृक्षासारखे; असंख्य पारंब्या असलेल्या, आपल्या प्रचंड विस्ताराने मोठा भूभाग व्यापलेल्या, शेकडो पक्षांना आधार देणा-या !! या अखिलमंगलरूप, शिवरूप वृक्षराजाच्या कृपासावलीत, जन्मजन्मांतरी जिची जीवाला एकमात्र आस लागलेली, सतत हवीहवीशी वाटलेली चिन्मयविश्रांती सहजतया लाभते. अंगांग मोहरून टाकणारी ही सुखद शांतशीतल जाणीव, जीवपणाचे भानही विसरायला लावणारी आहे !

श्रीमद् आचार्यांच्याच तत्त्वरूप पदचिन्हांचे अनुसरण करीत करीत गेली अनेक शतके कोट्यवधी जीवांचा उद्धार झालेला आहे, पुढेही होतच राहणार आहे. अहो, या महन्मंगल, परमतेजस्वी अद्वैतज्ञानभास्कराचा एकेक कृपाकिरणही आयुष्याच्या धन्यतेला पुरेसा आहे. शिवाय हा ऊर्जस्वल ज्ञानमार्तंड तेज:पुंज असला तरी दाहक अजिबातच नाही. क्षीरसागराला भरती आणणा-या अमृतकराला, त्या शीतल चंद्रालाही सुशीतलत्व प्रदान करणारा हा परमशांत चिद्गगनभुवनदिवा आहे, विश्वाभास मावळवीत साधकहृदयी अद्वय-अब्जिनीचा विकास करण्यासाठी उदयलेला नवल-चंडांशू आहे ! या अपूर्व-मनोहर अलौकिक-सुंदर सहस्रकराला वारंवार दंडवत घालतो, तेवढीच माझी परंपरेने आलेली मिराशी आहे; आणि तीच माझे सकलैश्वर्यदायक महद्भाग्यही !!

जगद्गुरु भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचे किती व कसे गुणगान करावे? आपली लेखणी-वाणी फार फार तोकडी आहे त्यासाठी. अहो, साक्षात् ज्ञानावतार भगवान श्री ज्ञानेश्वर माउली देखील, *"भाष्यकाराते वाट पुसतू ।"* असे म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान प्रांतातील सार्वभौमत्व मान्य करतात आणि त्यांच्याच अद्वैतसिद्धांताचे स्वानुभूत प्रतिपादन आपल्या वाङ्मयातून करतात. म्हणून आपण केवळ सद्गुरुकृपेनेच लाभलेल्या, श्री आचार्यांच्या चरणींचे अनमोल रज:कण मस्तकी धारण करण्याच्या आपल्या अद्भुत भाग्याचा वारंवार हेवा करावा, यात नवल ते काय? हे अपूर्व सुखभाग्य तरी काय थोडे म्हणता येईल का?

भगवान श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांचा अद्वैत सिद्धांत केवळ एका वाक्यात "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: ।" असा सांगता येत असला, तरी त्याच्या सविस्तर आकलनासाठी आजवर उत्तमोत्तम ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेले आहेत महात्म्यांनी. पण त्या सर्वंकष सिद्धांताची व्याप्ती एखाद्याच्या पूर्ण कवेत आलेली आहे, हे म्हणणे धारिष्ट्याचेच ठरावे. तरीही माझ्या वाचनात आलेल्या एका विलक्षण ग्रंथाचा मुद्दाम उल्लेख करतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे यांनी बेळगाव येथील श्रीशंकर जयंती महोत्सवात केलेली, श्री आचार्यांच्या "शिवानंदलहरी" या भावगर्भ स्तोत्रातील अडतिसाव्या श्लोकावरील चार प्रवचने *"चित्तडोहावरील आनंदलहरी"* या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झालेली आहेत. या ग्रंथात पू.दादांनी सर्वसामान्यांनाही सहज समजेल अशा सोप्या मराठी भाषेत श्री आचार्यांचे समग्र तत्त्वज्ञान नेमकेपणे विवरिले आहे. माझी सर्वांना प्रेमळ विनंती आहे, हा जबरदस्त ग्रंथ जरूर पाहा, अभ्यासा. त्यातून समोर उभे ठाकणारे श्रीमत्शंकर भगवत्पादाचार्यांचे भव्य-दिव्य स्वरूप आपल्याला कायमच तत्त्व-ऊर्जा देणारे, आपले लळे पाळीत आपल्याला ब्रह्मबोधाचे खाजे सप्रेम भरवणारे व निरंतर आनंदमय करणारेच आहे. आचार्य तत्त्वज्ञानावरचा दुसरा इतका सोपा व सुंदर मराठी ग्रंथ आजवर मी तरी पाहिलेला नाही !

भारतभूमीचे चिरंतन आणि अमूल्य वैभव असणा-या भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या पावन, सर्वतीर्थास्पद श्रीचरणीं, आजच्या श्रीशंकरजयंतीच्या पर्वावर, आपण सर्वांनी मिळून प्रेम-कृपादानाची याचना करीत वारंवार नतमस्तक होऊया; आणि भगवान श्री माउली म्हणतात त्याप्रमाणे श्रीमद् आचार्यांनी दाखवलेल्या उपासनावाटेवरून मार्गक्रमण करीत ब्रह्मबोधाच्या महानगरीत सुखरूप पोहोचूया !

आजच्या पावन दिनापासून भगवान श्री आचार्यांचे कमीतकमी एक तरी स्तोत्र दररोज न चुकता म्हणायचा सेवाप्रयत्न आपण सर्वांनी अंगवळणी पाडूया व त्या स्तोत्रमाधुर्यात, त्यातील भक्तिप्रेमात रंगून जाऊन येणारा आपला प्रत्येक दिवसही सत्कारणी लावूया. एवढे तरी नक्कीच करू शकतो आपण. त्याद्वारे आचार्यांच्या कृपाऋणाचे, त्यांच्या त्रिभुवनपावन नामाचे स्मरणही आपल्याला अविरत होत राहील. हेही भाग्यच मोठे ! त्यातूनच हळूहळू त्यांच्या समग्र वाङ्मयब्रह्माचेही अनुसंधान होऊन आपण "चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहं ।" या आचार्यांच्या तत्त्वज्ञानाच्या सारसिद्धांताचीही अनुभूती त्याच्याच कृपेने लाभून धन्य धन्य होऊन जाऊ !

श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् ।नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् ॥

श्रीमदाद्य शंकराचार्य भगवान की जय ।