वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय्य तृतीया(Askahaya Tritiya 2025) म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. चैत्रागौरीच्या आंदोलनोत्सवाची या दिवशी सांगता होते. यंदा ३० एप्रिल रोजी अक्षय्यतृतीया आहे.
अक्षय म्हणजे अविनाशी, म्हणूनच या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदि पुण्यकर्म अक्षय टिकते असे शास्त्र सांगते. ही शुभतिथी आहे, तशी पुण्यतिथीही आहे. त्यामुळे श्राद्ध दिवस मानून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. गृहस्थ सपत्नीक पितृत्रयी (वडील, आजोबा, पणजोबा) मातृत्रयी (आई, वडिलांची आई, वडिलांची आजी) मातामहत्रयी (आईची आई, आजी, पणजी) यांना उद्देशून पिंडरहित श्राद्ध करतात. विस्तृत श्राद्ध नसल्यास पितरांसाठी म्हणून दक्षिणेसह उदकुंभदान करतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्याने त्यानिमित्ताने पितरांचे स्मरण करून कुंभ दान केल्यास, उन्हापासून बचाव होण्यासाठी छत्री दान केल्यास दुसऱ्या जीवाला संतुष्टता लाभते आणि ते पुण्य आपल्या खात्यात जमा होते.
Akshaya Tritiya 2025: धन धान्याची उणीव भासू नये म्हणून अक्षय्य तृतीयेला करा शेगडीपूजन!
याशिवायही अक्षय्य तृतीयेला आणखी काही व्रत केली जातात, त्याबद्दल जाणून घेऊ.
वैशाख शुद्ध तृतीयेस पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी राहू मिथुन राशीत आणि सहा ग्रह उच्चीचे असताना माता रेणुकेच्या पोटी भगवान परशुरामांचा जन्म झाला म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी परशुराम जयंती साजरी करतात. या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्यास अर्घ्य देतात. यंदा तिथीने परशुराम जयंती २९ एप्रिल रोजी झाली.
याच दिवशी अलवण तृतीया व्रत करतात. हे स्त्रीव्रत असून द्वितीयेला उपवास करतात. तृतीयेला गौरीची पूजा करतात. मीठ न घातलेले अर्थात अळणी पदार्थ सेवन केले जातात. हे व्रत भाद्रपद किंवा माघाच्या शुक्ल तृतीयेपर्यंत केले जाते.
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
सद्यस्थितीत हे व्रत फारसे केले जात नाही. परंतु आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, आहारातून मीठ कमी केले तर हे व्रत नक्कीच आरोग्यदायी ठरेल. मिठाचा त्याग व्रताची सात्त्विकता अधिकच वाढवील यात शंका नाही.
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..