लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : शहरातील सुंदरनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह एका महिलेच्या घरात गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या तरुणांची हत्या की आत्महत्या? असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. मन्सूर चाँद शेख (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी कडा पोलीस चौकीत ठिय्या देत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदरनगर येथे राहणारा मन्सूर चाँद शेख याचा मृतदेह कृषी उत्पन्न बाजार समितीलगतच असलेल्या एका भाडेकरू महिलेच्या घरात मंगळवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदरील महिलेने कडा पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलीस हवालदार बाबासाहेब राख, पोलीस शिपाई बंडू दुधाळ यांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला होता. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
.....
दोन्ही घरात गळफास कसे?
महिला पतीसह या ठिकाणी राहत आहे. तिचा पती एका ठिकाणी शिपाई म्हणून काम करतो. सोमवारी रात्री तो घरी नसताना ही महिला व मृत तरुण दोघेच घरात होते. दोघात काय घडले समजले नसले तरी दोन्ही घरांत दोन साडीचे गळफास होते. यात तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले आहे; पण दोन्ही घरांत गळफास कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
....
मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाइकाची भूमिका
आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी, यासाठी नातेवाईक पोलीस चौकी कडा येथे गेले; पण पोलीस अधिकाऱ्यांनी आष्टीला या मग गुन्हा दाखल करू, असे म्हणाले. तर कडा चौकीतच गुन्हा दाखल करा, नसता आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत तरुणांचे मंगळवारी दुपारी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाले.
...