बस प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना
अंबाजोगाई : लॉकडाऊननंतर थांबलेली एसटी बस आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागली आहे; परंतु बसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासी मास्कचा वापर करीत नाहीत तसेच अनेक वेळा बसचे निर्जंतुकीकरण होईनासे झाले आहे.
वीज तारा लोंबकळू लागल्याने धोका
माजलगाव : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीज तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. ही रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वीज ग्राहकांमधून केली जात आहे.
अंबाजोगाईतील मंडई परिसरात अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरात दररोज भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. व्यावसायिक लोक खराब भाजीपाला रस्त्यावर टाकत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी भाजी विक्रेते व्यापारी व नागरिकांमधून होत आहे.