बीड : जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगाना मोफत तीनचाकी स्कूटर दिली जाणार आहे. सदरील योजनेंतर्गत स्कूटर वाटपाचे उद्दिष्ट ५४ असून १३२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लकी ड्रॉ काढून लाभार्थ्यांना स्कूटरचे वाटप केले जाणार आहे. बीड शहरातील नगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता हा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ टक्के दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर विथ अडॉप्टर वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांच्याकडे दिव्यांग बांधवांनी अर्ज केले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील १३२८ अर्ज प्राप्त झाले आहेत; परंतु ५४ दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कूटर विथ अडॅप्टरचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असल्याने लकी ड्रॉ काढला जाणार आहे.
अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने निर्धारित उद्दिष्टानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता हा लक्की ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. हा लकी ड्राॅ इन कॅमेरा होणार आहे. सर्व अर्जदारांनी लकी ड्रॉसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस. एन. मेश्राम यांनी केले आहे.