लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : शहरात शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असताना शहरात सर्वच व्यवस्था सुरळीत सुरू होत्या. सर्व कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे यावेळी दिसून आले. याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव होण्याची भीती वाढत आहे.
धारूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणाऱ्या कोरोना नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. शनिवार व रविवार या दिवशी वीकेंड लॉकडाऊन असताना फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना शहरात शनिवारी, रविवारी जवळपास सर्वच व्यवसाय सुरू होते. बाजारपेठेत गर्दी दिसत होती. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणाऱ्या सर्व नियमांचे सर्रास शहरात उल्लंघन केले जात आहे. रस्त्यांवर सर्वत्र गर्दी दिसून येत होती. मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या जास्त होती. सोशल डिस्टन्सिंगचे सर्वत्र तीनतेरा वाजल्याचे चित्र होते. प्रशासकीय यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी नागरिकांंनी कोरोनाचे नियम पाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.