बीड : जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणाऱ्या पावसाने मागील दहा दिवसांपासून ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. रोज ढग येतात आणि वारे वाहतात. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. ८ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्रामध्ये प्रवेश झाला होता. वाहन गाढव होते. २१ जून रोजी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश केला. वाहन कोल्हा आहे. एकीकडे चांगला पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आतापर्यंत चुकला आहे. गाढवाने धोका दिला, कोल्हा तारणार का? याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात २४ जूनपर्यंत सरासरी १४२.३ मिमी एकूण पाऊस नोंदला आहे. मागील वर्षी याच कालावधीत इतकाच पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सात लाख ४६ हजार ४८ हेक्टर असून, तुलनेत २३ जूनपर्यंत केवळ ४२.०५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कपाशीच्या तुलनेत यंदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढल्याचे कृषी अहवालावरून दिसून येते. कपाशीचा पेरा १ लाख १३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रात झाला असून, सोयाबीनचा पेरा १ लाख २१ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रात झाला आहे. १२ जून रोजी बीड, माजलगाव, धारूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली असून, पेरण्या खोळंबल्या आहेत.
पेरणीयोग्य पाऊस २५ टक्के परिसरात झाल्याने पेरण्या झाल्या; परंतु ७५ टक्के परिसरात पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे शेतकरी सांगतात. जेथे पेरण्या झाल्या, तेथील ओल निघून गेल्याने पिकांच्या उगवण क्षमतेवर परिणामाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पिकांना पावसाच्या बूस्टर डोसची गरज असून पेरण्यांसाठी दमदार पाऊस आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
---------
अपेक्षित पाऊस - १०२
आतापर्यंत झालेला पाऊस - १४२.३
सर्वात कमी पाऊस - ८४.२ मि.मी. आष्टी तालुका
सर्वात जास्त पाऊस - २२४ मि.मी. परळी तालुका
कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)
अपेक्षित पेरणी क्षेत्र ५,२७,२००
आतापर्यंत झालेली पेरणी ३,१३,७७४
तालुकानिहाय पेरणी आणि झालेला पाऊस
झालेला पाऊस पेरणी (हेक्टरमध्ये)
बीड १०६.५ मिमी.- ३५९५० हेक्टर
पाटोदा ११२.६ -----१२५६८
आष्टी ८४. २ ----२९३६२
गेवराई ११०.३ ---- २३३१३
माजलगाव १८५.९ --- ३४७५५
अंबाजोगाई २१४. ० --- ३८४६५
केज १६३.१ ----- २६२१५
परळी २२१.१ -----३८०२२
धारूर २०९.२ --- ३३४७९
वडवणी १४४.२ --- १९०८०
शिरूर कासार १०९.१ --- २२५३४
पीकनिहाय क्षेत्र
प्रस्तावित पेरणी -- झालेली पेरणी
कापूस ३,३२,००५ -- १,१३,८५६
सोयाबीन २५९८१६-- १२१५५८
तूर ६१३०८ --- ३०८४२
उडीद २७६१७-- १६३१३
मूग २२२९३-- ७०९७
बाजरी ६४६९९-- १९६०३
-----
अपेक्षित खरीप पेरणी क्षेत्र ७,४६,०४८
आतापर्यंत झलेली पेरणी ३, १३, ७४३
४२.०५ टक्के पेरणी
-----------
दहा दिवसांपासून उन्हामुळे ओल कमी झाली होती. त्यामुळे कोवळी पिके वाळून जाण्याची भीती होती. शेतकरी हवालदिल होते. यातच गुरुवारी झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्त टळले आहे. - अनिल गाडेकर, शेतकरी, शिरूर कासार.
-----
८ तारखेला चांगला पाऊस झाल्याने पेरण्या केल्या; परंतु चार- पाच दिवसांनंतर वारे सुटल्याने पावसाने ओढ दिली. ऊन पडल्याने ओल निघून गेल्याने पिके संकटात आहेत. रोजच वारे सुटत असल्याने संकटाकचे ढग गडद होत आहेत.
-अशोक बोंगाणे, शेतकरी, गंगनाथवाडी, ता. बीड.
----------
दमदार पाऊस नसल्यामुळे पेरण्या थांबल्या आहेत. ज्यांनी पेरण्या केल्या तेथे कोवळी पिके माना टाकत आहेत. पिकांच्या मुदण्या होत आहेत. ढग दाटून येतात; पण पाऊस नाही. मोठा पाऊस झाल्यास पुढचे संकट टळणार आहे. पावसाची प्रतीक्षा आहे.
-केशव माने, शेतकरी, गुंदावाडी, ता. बीड.