Suresh Dhas Beed News: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची शनिवारी (२२ फेब्रुवारी) भेट घेतली. या भेटीवेळी ग्रामस्थांनी आठ मागण्या केल्या. या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर २५ तारखेनंतर कुणाचंही ऐकून घेणार नाही, असा इशारा धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी सरकारला दिला. सुरेश धस यांच्याकडे आठ मागण्या केल्या. त्या मागण्या सुरेश धस यांनी भेटीनंतर वाचून दाखवल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याने धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा नंतर कुणाचंही ऐकणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला धस यांच्यामार्फत सरकारला दिला.
सुरेश धस यांनी वाचून दाखवल्या मागण्या
"सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत, त्यात पोलीस निरीक्षक महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणे. त्यानंतर धनंजय देशमुख आणि इतर आम्ही चार दिवसांपूर्वी बसलो होतो. त्यावेळी एसआयटीमध्ये सायबर सेलच्या दोन तज्ज्ञांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी झाली. ती बाब मी ज्याठिकाणी कानावर घालायची ती घातली आणि त्यांनी ती मान्य केली. सोमवारपर्यंत त्याचे आदेश येतील", असे सुरेश धस यांनी सांगितले.
"६ तारखेची घटना, ९ तारखेची घटना एवढ्यापुरती मर्यादीत न ठेवता, घटनांच्या आधीच्या दोन महिन्यांपासून... पहिली जी केस झालेली आहे, १ शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते, त्यांनी फिर्याद दिली होती. त्यावेळपासूनचे सीडीआर तपासले पाहिजेत. त्यासाठी सायबर सेलचे दोन अधिकारी नेमण्याची विनंती केली आहे", अशी माहिती धस यांनी दिली.
महाजन केजच्या पोलीस ठाण्यात काय करतोय?
"महाजन हे बीडला आहे. तो तिथून येऊन केज पोलीस ठाण्यातील लॅपटॉपमध्ये काम करतो. कसं काय बसतो, त्याचा काय संबंध? त्यामुळे सहआरोपी म्हणून महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी आहे", असे धस म्हणाले.
"फरार कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करणे गरजेचे आहे. कारण हा आंधळे खूप चतुर आहे. त्याचे बगलबच्चे जर एका मोहित्याच्या तिथे ३०७ करू शकतात. हे आरोपी तारखेला येतात, तेव्हा चित्रविचित्र दिसणारे लोक येतात. ते त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी येताहेत. त्यामुळे कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे आहे", अशी मागणीही ग्रामस्थांनी केल्याचे धस यांनी सांगितले.
वाशीमधील पोलिसांनी मदत केल्याचा आरोप
"वाशी पोलीस ठाण्याचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गीते, गोरख फड, दत्ता बिक्कड यांचे सीडीआर तपासावेत आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आरोपींना पळून जाण्यात मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसे आणि त्यांची पत्नी, वायभसेच्या पत्नीने पैसे पाठवले आणि त्या सरकारी वकील होत्या. यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी यासंदर्भात पत्र दिले आहे", अशी माहिती धस यांनी ग्रामस्थांसमोर सांगितले.
"शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ती प्रक्रियेत आहे. त्यात काय अडचण आहे, का थांबली आहे, याबद्दल धनंजय देशमुख यांना खासगीमध्ये माहिती दिली आहे. जलदगती न्यायालयात प्रकरणाची सुनावणी होण्याची मागणी आहे", अशी माहिती धस यांनी दिली.
"संतोष देशमुख यांचा मृतदेह बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर ते केजच्या शासकीय रुग्णालयात आणणे अपेक्षित होते, पण पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने नेली होती. पण, पाठीमागे गाडी आल्याचे बघून पुन्हा गाडी वळवली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. कारण पाटील हा यात स्पष्टपणे आरोपी असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत हा आतमध्ये जायला पाहिजे होता", अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.
नितीन बिक्कडला अटक व्हायला पाहिजे होती -सुरेश धस
"नितीन बिक्कड याने धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक घेतली. याच बिक्कडने तांबोळी आणि शुक्लाला शासकीय निवासस्थानात बैठक घेतली. मग हा आरोपी कसा होत नाही. हे सगळे आरोपी ज्यावेळी इथून गेले, त्यानंतर वाशीमधून आरोपींना पळून जाण्यात मदत करण्यास नितीन बिक्कडचा वाटा आहे. या आठपैकी दोन मागण्या अंतिम टप्प्यात आहेत. इतर मागण्या लवकरात करण्याची मागणी आहे", असे धस यांनी सांगितले.
या मागण्यांसंदर्भात रविवारी (२३ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेईन किंवा सोमवारी मुंबईमध्ये भेटेन. जर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला, तर उपोषण पुढे ढकलावं, अशी विनंतीही सुरेश धस यांनी केली.