केज (जि. बीड) : खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) ताब्यात देण्यात आले आहे. कराडवर मकोका लावल्याचे समजताच परळीत समर्थकांनी आंदोलन केले. दुपारनंतर परळी शहर बंदची हाक देण्यात आली.
अनेक ठिकाणी जाळपोळ व बसवरही दगडफेक करण्यात आली. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच कराडवर संक्रांत आली असून, तो कोठडीत गेला आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागून त्यांना जिवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी १५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या कराडला मंगळवारी केज येथील न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. निशांत गोळे यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
रात्री ८ वाजेच्या सुमारास कराडला बीड जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले. आता बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी कराडला केजला आणणार आहेत. संतोष देशमुख हत्येत कराड याचा सहभाग निष्पन्न झाल्याने मकोका लावण्यासाठी सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला होता. न्यायालयीन कोठडी मिळताच पुढील तपासासाठी त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज एसआयटीने केला होता.
वकिलांनी काय युक्तिवाद केला?याप्रकरणी शासनाने नियुक्त केलेले माजलगाव येथील सरकारी वकील जितेंद्र शिंदे यांनी कराडला आणखीन १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला आक्षेप नोंदवित आरोपीचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कराड स्वतः होऊन पोलिसांना शरण आला आहे. १५ दिवसांची पोलिस कोठडी त्याला देण्यात आली होती. आता त्याला कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
जामिनासाठी अर्ज दाखल न्यायालयीन कोठडी सुनावताच जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली. मकोकासंदर्भात कोणतेही कागदपत्रे आपल्याकडे आलेली नाहीत, असेही ते म्हणाले.
३०२ मध्ये समावेश करा वडिलांची हत्या करणाऱ्यांविरोधात मकोका लावून ३०२ मध्ये त्यांचा समावेश करावा, अशी मागणी देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली. तपास योग्य दिशेने चालू असल्याचे एसआयटी प्रमुखांनी सांगितल्याचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले.