दुष्काळमुक्ती : जायभायवाडीत शेती, फळबागा फुलल्या; जोडव्यवसायातूनही रोजगार
अनिल महाजन
धारूर : बारमाही दुष्काळी, घागरभर पाण्यासाठी वणवण, ऊसतोडणी कामगारांचे गाव ही ओळख पुसण्यासाठी पाणी फाउंडेशनचे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या जायभायवाडी गावाचे रूपडे बदलत आहे. सलग तीन वर्षे श्रमदानातून एकजुटीचे सातत्य राखत साधलेले परिवर्तन इतर गावांना मार्गदर्शक ठरत आहे. येत्या काही वर्षांत कोयतामुक्तीचा संकल्प जायभायवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्यातील डोंगरकुशीतील जायभायवाडी बारमाही दुष्काळी असणारी. पन्नास कुटुंबाच्या या वाडीची लोकसंख्या साडेचारशेच्या घरात आहे. पावसाच्या भरवशावर खरिपाचा पेरा घ्यायचा आणि पुढचे सहा महिने ऊसतोडणीला जायचे, हे ठरलले. यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. हाताला दुसरा कुठलाच उद्योगधंदा नव्हता.
२०१७ मध्ये पाणी फाउंडेशनची वाॕॅटर कप स्पर्धा आली. यात सहभागी होत ग्रामस्थांनी परिवर्तनाचा ध्यास घेतला. एकजुटीने श्रमदानातून गावाचे चित्रच पालटले. ग्रामस्थांची तळमळ पाहून मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, भारतीय जैन संघटना व या भागातील नागरिकांनी तन, मन व धनाचे बळ दिल्याने गावात जलसंधारण चळवळ यशस्वी झाली. गावाच्या कार्यक्षेत्रातील थेंबभर पाणीदेखील बाहेर जाणार नाही व ते जमिनीत मुरवण्यासाठी आवश्यक सर्व तंत्रशुद्ध कामे केली. लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले. सतत तीन वर्षे हे काम केल्याने गावपरिसरात पाणी पातळी वाढली. फळबागा फुलत आहेत. पशुधनाची संख्यादेखील वाढली आहे. दहा ते बारा कुटुंबांचा कोयताही सुटला आहे. शाळेचा कायापालट झाला आहे. महिला व पुरुषाचे आठ बचत गट असून या माध्यमातून छोट्या उद्योगांना आर्थिक मदत होत आहे. पाणीदार बनलेल्या जायभायवाडीचे परिवर्तन तालुक्यातील इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
वाॕॅटर कप पूर्वीची वाडी
गावात एकही फळबाग नव्हती, रबीचे क्षेत्र अत्यल्प होते. ५० पैकी ४५ कुटुंब ऊसतोडणी करणारे होते. फक्त ८ कुटुंबच शेळीपालन करीत. खवा उत्पादन मोजकेच होते.
वाॕॅटर कपनंतरची फलश्रुती
गावात आठ ते दहा शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. रबी क्षेत्रात ५० हेक्टरच्या आसपास वाढ झाली. दहा कुटुंबांच्या हातातील कोयता सुटला. शेळीपालन वाढले. प्रत्येक कुटुंबाकडे ३०० पेक्षा जास्त शेळ्या आहेत. रोज २०० किलो खवा उत्पादन येथे होत आहे.